पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी काही कालावधीसाठी संपूर्ण जग हे गडद काळोखात जाते. म्हणजेच 'अर्थ अवर' ( Earth Hour 2022 ) या संकल्पनेत जगभरातील नागरिक तासभर लाईट्स बंद करू, मेणबत्त्या पेटवून हा एक तास साजरा करतात. तुम्हाला माहित आहे का, असे का केले जाते. चला तर याविषयी अधिक जाणून घेऊयात…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००७ पासून ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथून 'अर्थ अवर' ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर हळूहळू ती जगभर पसरली. २००८ मध्ये ३५ देशांनी 'अर्थ अवर' मध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सध्या या मोहीमेत एकूण १७८ देश उत्फूर्तपणे सहभागी होतात.
'अर्थ अवर 2022' हा एक तास वीज बचतीच्या उद्देशाने साजरा केला जातो. वर्ल्ड वाईड फंडने (WWF) सुरू केलेल्या या मोहीमेचे उद्दिष्ट लोकांना वीज आणि पर्यावरण संरक्षण महत्त्वाबद्दल जागरूक करणे हे आहे. 'अर्थ अवर'या संकल्पनेत जगभरातील नागरिक सायंकाळी ८.३० ते ९.३० या एक एका तासासाठी दिवे बंद ठेऊन आणि सौरऊर्जेचा अवलंब करण्याचे इतरांनाही आवाहन करतात.
आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाणही जास्त असल्याने प्रत्येक व्यक्तिमागे विजेचा वापर वाढत जाताे. विजेचे काही नैसर्गिकरित्या स्त्रोत मुबलक प्रमाणात आहेत; परंतु पाणी, वारा, समुद्री लाटा, सूर्यप्रकाशाची ही ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वीज ही जपून वापरणे आणि पुढच्या पिढीसाठी तिचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणूनच 'अर्थ अवर' या मोहिमेतून लोकांच्या एकजुटीतून, 'वीज वाचवा' हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाताे.