मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्यातील 50 नवीन पर्यटन स्थळांची निवड करून तेथे थीम पार्क, अॅडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा अंर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ( Tourism )
संबंधित बातम्या
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवक-युवतींना पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणासाठी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शिवसागर कोयना, गोसीखुर्द जलाशय (भंडारा), तसेच वाघूर जलाशय (जळगाव) येथे नावीन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. लोणार (बुलडाणा), अजिंठा-वेरुळ (छत्रपती संभाजीनगर), कळसूबाई (भंडारदरा), त्र्यंबकेश्वर (नाशिक) तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे 333 कोटी 56 लाख किमतीचा जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम व सुरक्षित सुविधा पुरविण्यासाठी श्रीनगर, जम्मू-काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी, अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही ठिकाणी तेथील राज्य शासनांनी मोक्याच्या जागा उपलब्ध करून दिल्या असून या जागांसाठी 77 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. ( Tourism )