सांधेदुखीकडे दुर्लक्ष नको, जाणून घ्‍या सोपे उपाय

सांधेदुखीकडे दुर्लक्ष नको, जाणून घ्‍या सोपे उपाय

अनेकदा आपल्याला सांधेदुखी किंवा आर्थ्रायटीससारख्या शरीरवेदना जाणवत असतात. त्याकडे आपण काहीवेळा दुर्लक्षही करतो; पण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी ही मागणी शरीर आपल्याकडे करत असते, त्या हाका आपण ऐकल्या पाहिजेत. शरीराला वेदना झाल्या की, गोळ्या घेणे ही सर्वांचीच नेहमीचीच सवय आहे; पण आपल्या शरीराच्या हाका ऐकून त्याला खरंच प्रतिसाद द्यायचा असेल, तर या दुखण्याचे मूळ कारण जाणून घेतले, तर त्यावर योग्य ते उपाय करता येतील. ( Healthy Joints)

सांधेदुखीवर वेळत करा प्रतिबंधक उपाय

वाढत्या वयानुसार सांधेदुखी होणे काही नवीन नाही. आपण आयुष्यभर घेतलेले शारीरिक श्रमाचा ताण खांदे, कोपरे, गुडघे, मनगटे आणि नितंब यांच्यावर येत असतो. थोडक्यात सतत शारीरिक ताण दिलेल्या शरीराकडे लक्ष न दिल्याने सांधेदुखीच्या रूपात त्याची परतफेड होते; पण काही प्रतिबंधक उपाय वेळीच केल्यास आपण खूप काळ वेदनाविरहीत आयुष्य व्यतीत करू शकतो.

Healthy Joints :  खालील उपाय ठरतील फायदेशीर

  • पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे आपल्या योग्य व्यायाम, त्याचे प्रकार, अपघात, पलंग आणि कामाचे ठिकाण या सर्वांचा आढावा घ्या.
  •  वेदना कशी, किती आहे, याची नोंद करून ठेवा. त्यामुळे पुन्हा पुन्हा उद्भवणारी वेदना कळण्यास सुलभ जाईल.
  •  आपल्याला सातत्यपूर्ण वेदनांना सामोरे जावे लागत असेल, तर प्रगत चुंबकीय उपचारांचा उपयोग करून घेता येईल. आर्थ्रायटीसच्या वेदना नियंत्रित करण्यासाठी ही थेरपी खूप परिणामकारक आहे. निकॅपमध्ये चुंबक ठेवून ती वापरल्यास सांध्यांची सूज कमी होते आणि होणारा दाह कमी होतो.
  • सांधेदुखी होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते थोडक्यात, डीहायड्रेशन असं ज्याला म्हटले जाते. चुंबकीय पाण्याचे सेवन केल्यास सांधेदुखी कमी होण्यास फायदा होतो.
  • अधिक काळ एकाच स्थितीत काम करणे विशेषतः अयोग्य स्थितीचा परिणाम आपल्या शरीरावर काही कालावधीनंतर दिसू लागतो. थकवा, झोपण्याची अयोग्य स्थिती, खूप अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणे आणि अतिप्रवास या सर्वांचा प्रतिकूल परिणाम आपल्या शरीर ठेवणीवर होत असतो. त्यामुळे दिवसभरात अधूनमधून शरीराला ताण देणारे व्यायाम केल्यास आपल्याला चांगली शरीरस्थिती राखण्यास मदत होते. त्यामुळे पाठदुखी आणि स्नायूंचे दुखणेही कमी होते.
  • उंच टाचेची पादत्राणे घालणे आणि चुकीच्या मापाची पादत्राणे यामुळे शरीराचे संरचना बदलते. काही कालावधीनंतर आपल्या सांध्यावर त्याचा दाब पडू लागतो. पादत्राणांच्या आतल्या बाजूने घातले जाणारे जेल हिल, इनसोल याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे चालताना बसणारे धक्के थोपवता येतात, शिवाय घोट्यात पाय मुरगळण्यासारख्या घटना टाळतात येतात.
  • स्त्रियांमध्ये मेनोपॉज किंवा पाळी बंद होण्याच्या काळात स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी खनिजयुक्त पाणी प्यायल्याचा खूप अधिक फायदा होतो. आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे कॅल्शिअमचे सेवन करणे गरजेचे आहे. मॅग्नेट घातलेल्या पाण्यात लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हे धातू असतात. हाडांची घनता राखून ठेवण्यासाठी आणि हाडे ठिसूळ होणारा ऑस्टोपॉरोसिस नावाचा आजार टाळण्यासाठी हे सर्व घटक योग्य प्रमाणात शरीरात असणे आवश्यक आहे. शरीरासाठी आवश्यक असणारी खनिजे आणि प्रथिने यांच्यामुळे हाडे आरोग्यदायी आणि मजबूत राहतात; मात्र कार्बोहायड्रेट आणि फॅटी अ‍ॅसिड असणारे खाद्यपदार्थ उदाहरणार्थ, तळलेले आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर; कारण या पदार्थांमुळे सांध्यांमध्ये सूज येण्याचे प्रमाण वाढते.

सांध्यांना मसाज करा

सांधेदुखी आणि सांध्यांची होणारी जळजळ यासाठी ऑलिव्ह तेलाने खांदे आणि गुडघे यांना मसाज करावा. त्यामुळे तुलनेने दोन्हीला आराम मिळतो. सांध्यांना मसाज करताना हृदयाच्या दिशेने मसाज करावा. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. अर्थात, दैनंदिन आयुष्यात सांधे खूप अधिक दुखत असतील आणि सहन होत नसेल, तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणेच उत्तम!

डॉ. संजय गायकवाड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news