कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या उद्याच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या उद्याच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात शनिवारी (दि. 27) सायंकाळी 5 वा. जाहीर सभा होणार आहे. तपोवन मैदानावर सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या (एस. पी. जी.) अधिकार्‍यांनी सभा स्थळ ताब्यात घेतले आहे. गुरुवारी एसपीजीच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून जिल्हा पोलिस, जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकार्‍यांना सूचना दिल्या. दरम्यान, सभेसाठी दीड हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

कोल्हापूर लोकसभा महायुतीचे जिल्ह्यातील उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशिल माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. सायंकाळी तपोवन मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्लीसह मुंबईतील वरिष्ठ अधिकार्‍यांसह सुरक्षा पथके गुरुवारी कोल्हापुरात दाखल झाली आहेत. सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेर्‍यांना मनाई करण्यात आली आहे. विशेष पथकातील अधिकार्‍यांसह दीड हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

राज्य गुप्त वार्ता विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कळंबा रोडवरील तपोवन मैदानाला सकाळी भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी सकाळी व सायंकाळी सुरक्षा यंत्रणांची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.

केंद्रीय राखीव सुरक्षा दलासह राज्य राखीव, जिल्हा पोलिस, गृहरक्षक दलाचे जवानांसह अन्य जिल्ह्यातील पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला आहे. आज, सायंकाळी बंदोबस्ताचे वाटप केल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. जाहीर सभास्थळी तसेच प्रवेशद्वारांवरही कडक तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या दौरा कालावधीत ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 27)कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौर्‍यादरम्यान मान्यवरांना झेड प्लस सुरक्षा व ए.एस.एल.सह वर्गवारी असल्याने संरक्षित व्यक्ती यांच्या सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून कोल्हापूर विमानतळ परिसर व संपूर्ण कोल्हापूर शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मधील कलम 144 अन्वये बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात नमूद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news