सातारा : दरीत ढकलून खून करणारे तिघे जेरबंद

सातारा : दरीत ढकलून खून करणारे तिघे जेरबंद

सातारा, पुढारी वृत्तसेवा : एकीव (ता. जावली) येथील धबधबा परिसरात एकमेकांना खुन्नस दिल्याने वादावादी होऊन टोळीने दोन मित्रांना दरीत ढकलून देत दुहेरी खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एलसीबी) ही कारवाई केली असून संशयित सदरबझार, सातारा येथील आहेत. साहिल मेहबूब शेख (वय 18), असिफ माजिद शेख (23), निखिल राजेंद्र कोळेकर (23, तिघे रा. सदरबझार, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. 16 जुलै रोजी अक्षय शामराव अंबवले (28, रा. बसाप्पाचीवाडी, ता.सातारा), गणेश अंकुश फडतरे (34, रा. करंजे, सातारा) हे इतर मित्रांसोबत एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास धबधबा परिसरात आणखी काही युवकही तेथे होते. तेथे एकमेकांकडे पाहण्यावरुन दोन गटात वादावादी झाली. यावेळी अक्षय व गणेश यांना दुसर्‍या गटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच अक्षय व गणेश दोघे दरीच्या कठड्याजवळ आले. यावेळी काही संशयित त्या दोघांना दरीत ढकलून दे, असे म्हणत चेतावत होते. अवघ्या काही क्षणात संशयित टोळक्याने दोन्ही युवकांना उंचावरुन खाली फेकून दिले. सर्वांदेखत ही घटना घडल्यानंतर तेथे पळापळ झाली.

या घटनेची माहिती सातार्‍यात उशीरा पसरल्यानंतर बचाव पथक व पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे मृतदेह वर काढण्यात आले. दि. 17 जुलै रोजी अनोळखी युवकांविरुध्द मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मेढा व एलसीबी गेली तीन दिवस सातारा शहरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांना संशयितांबाबत माहिती मिळाली. तोपर्यंत संशयित जिल्ह्यातून पसार झाले होते. पोलिसांनी संशयितांना शोधून अखेर त्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. एलसीबीने त्यानंतर संशयितांचा ताबा मेढा पोलिसांकडे दिला.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी बाळासाहेब भालचिम, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष तासगांवकर, रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, राकेश खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, अजय जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, विकास गंगावणे, दत्तात्रय शिंदे, संभाजी बाबर, अभिजीत वाघमाळे, प्रदिप उदागे, निलेश देशमुख, गणेश घोरपडे, स्नेहल सोमदे, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, प्रशांत ठोंबरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news