कोल्हापूर : वडणगेत दोन गट भिडले

कोल्हापूर : वडणगेत दोन गट भिडले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीच्या आयोजनावरून वडणगे (ता. करवीर) येथे सोमवारी रात्री उशिरा दोन गटांत झालेल्या धुमश्चक्रीत तिघे गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांकडून प्रचंड दहशत माजविण्यात आली. घरावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने तणावाची स्थिती होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडील 28 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य संशयित कुणाल शेलारसह 8 जणांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे.

दोन्ही गटांकडून झालेल्या हाणामारीत लोखंडी गज, काठ्यांसह दगडांचा वापर करण्यात आल्याचे करवीर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. हल्ल्यात हर्षवर्धन शिवाजी पाटील, धैर्यशील संजय पाटील, आशिष बंडोपंत बराले (रा. वडणगे, करवीर) हे जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

सुशांत रामचंद्र तांबेकर (वय 24, रा. रणदिवे गल्ली, वडणगे, ता. करवीर) याच्या फिर्यादीनुसार कुणाल बाबासो शेलार, ऋषीकेश अनिल ठाणेकर, राहुल बाबासो शेलार, यश बाळासाहेब जौंदाळ, अनिल ऊर्फ रोहित संजय भालेराव, विशाल सासणे, सिद्धेश उत्तम मोरे (सर्व रा. वडणगे) आणि सनी संजय पाटील (रा. भुयेवाडी) याच्यासह अनोळखी 8 ते 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिस्पर्धी गटाकडून सुनंदा बाबासो शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय इंगवले, सुशांत तांबेकर, अक्षय तांबेकर, बबन तांबेकर, अजित रणदिवे, पिराजी घोरपडे, राहुल लोहार, प्रदीप पाटील (रा. वडणगे, ता. करवीर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त वडणगे येथील अजित रणदिवे व कुणाल शेलार यांच्या गटांमार्फत येत्या 9 मार्च रोजी बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. शर्यती एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्याने; शिवाय बक्षिसांच्या रकमेवरून त्यांच्यात धुसफुस सुरू होती. या कारणावरून सोमवारी रात्री दोन गटांत राडा झाला. कुणाल शेलारसह त्याच्या साथीदारांनी लोखंडी गज, काठ्यांनी हर्षवर्धन पाटील, धैर्यशील पाटील, आशिष बराले यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

घरावर दगडफेक; वाहनांची तोडफोड

संशयितांनी रेणुुका मंदिराजवळील चौकात दहशत माजवून अक्षय शिवाजी इंगवले यांच्या घरावर दगडफेक करून दारात पार्क केलेल्या दुचाकीसह चौकातील दोन मोपेड, दुचाकीची तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सुनंदा शेलार यांनीही अजित रणदिवे, अक्षय इंगवलेसह 8 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news