तेल अवीव : आपल्या पाळीव प्राण्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण सहवासानेच समजून घेत असतो. आतापर्यंत पाळीव कुत्रा किंवा मांजर यांचे हावभाव, वर्तन यावरून त्यांना काय वाटते हे जाणून घेण्याबाबत काही संशोधनेही झालेली आहेत. सध्याचा जमाना हा 'एआय' म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. आता 'एआय'चा वापर करूनही या मुक्या जीवांचे विचार समजून घेता येऊ शकेल असे तज्ज्ञांना वाटते.
प्राण्यांची भाषा जाणून घेण्यास उत्सुक असणार्या, इस्राईलमधील तेल अवीव विद्यापीठातील प्राध्यापक योस्सी योवेल या संशोधकाने प्राणी त्यांच्या विशिष्ट आवाजांमधून नेमके काय बोलत असतात हे जाणून घेण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. त्यामध्ये योस्सी यांनी इस्राईलमधील वटवाघळांवर अभ्यास करून वटवाघळांचे आवाज, त्यांची हालचाल आणि ते पक्षी कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वटवाघळांच्या भाषेचे रूपांतर करण्यासाठी आधी योस्सी आणि त्यांच्या टीमने एआयचा वापर करून, वटवाघळांच्या आवाजांचे ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपातील प्रचंड मोठा डेटा गोळा केला.
पुढे प्रत्येक आवाज आणि त्याचा वेगवेगळा अर्थ यामधील फरक कसा ओळखायचा हे संगणकाला समजावून दिले. अशाच पद्धतीने योस्सीच्या टीमने व्हॉइस रेकग्निशन प्रोग्रामला मार्गदर्शन करून, प्रोग्रामच्या अल्गोरिदमने स्क्रीनवर दिसणार्या वटवाघळांच्या संवादाची योग्य आवाजाशी सांगड घातली. 'या सगळ्याच्या शेवटी वटवाघळांची भाषा समजून घेऊन, ते काय बोलत आहेत हे संगणक आपल्याला सांगेल,' असे योस्सी यांच्या टीममधील अदि रचूम यांनी सांगितले. इतकेच नाही, तर वटवाघळांचा आवाज ऐकून, त्याचा अर्थ लावून, ऐकवलेला आवाज हा खाण्यासंबंधी असल्याचे योस्सीच्या टीमने तयार केलेल्या 'एआय ट्रान्स्लेटर'ने ओळखून दाखवले. 'माझ्या हयातीत तरी प्राणी वा पक्ष्यांची भाषा बोलून दाखविणार्या यंत्राची निर्मिती होईल, असे मला वाटत नाही. मात्र, 'एआय' हे आपल्याला नक्कीच त्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल,' असे योस्सी योवेल यांनी म्हटले आहे.
प्राण्यांची भाषा समजून घेण्यासाठी किंवा तिचा अर्थ लावण्यासाठी 'एआय'चा वापर करणारा योस्सी योवेल हा एकमेव संशोधक नसून, लिंकन विद्यापीठातील पशुवैद्यकीय वर्तणुकीशी संबंधित औषधांचे प्राध्यापक, डॅनियल मिल्स यांनीदेखील 'एआय'कडे अशी क्षमता असल्याचे म्हटले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले पाळीव प्राणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा अर्थ लावण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती गार्डयिनच्या अहवालातून मिळते. डॅनियल मिल्स यांची टीम ही कुत्रा, मांजर, घोडा यासारख्या प्राण्यांच्या चेहर्यावरील हावभावांचा अर्थ लावण्यासाठी 'एआय'ची मदत घेत आहे. त्यासाठी ते इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक व्हिडीओंचा आधार घेत आहेत. विविध संशोधक 'एआय'च्या मदतीने झेब्रा, गेंडा यासारख्या विविध प्राण्यांच्या आवाजांचा अभ्यास करून, आपल्या मानवी भाषेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, प्राण्यांची भाषा बोलणारे किंवा त्या भाषेचे 100 टक्के भाषांतर करणारे यंत्र कधी निर्माण होईल याबद्दल ठोस माहिती अजून तरी आपल्याला ज्ञात नाही.