हापूसप्रेमींसाठी खुशखबर : यंदा हापूसचा हंगाम 90 दिवसांचा; 15 फेब्रुवारीपासूनच हंगामाला सुरूवात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई : हापूसप्रेमींसाठी यंदाचे नवे वर्ष खुशखबर घेऊन आले आहे. यावर्षी 15 फेब्रुवारीपासूनच हापूसचा हंगाम सुरू होणार असून, तो तब्बल 90 दिवस चालेल आणि दरवर्षीपेक्षा 30 टक्के उत्पादन जास्त राहील.

हापूस उत्पादक शेतकरी कम व्यापारी हे मुंबईसह इतर ठिकाणच्या घाऊक व्यापार्‍यांना बागा खरेदी करून देतात. त्यासाठी शेतकर्‍यांना ठराविक रक्कम आगाऊ दिली जाते. हापूस आंबा बाग खरेदी केलेल्या व्यापार्‍यांकडेच विक्रीसाठी कोडनुसार पाठवला जातो. मुंबईतील सुमारे 250 घाऊक व्यापार्‍यांनी आतापर्यंत हापूसच्या बागा खरेदी केल्याचे समजते. मुंबई एपीएमसीमध्ये 800 घाऊक व्यापारी हापूसचा व्यापार करतात; तर स्थानिक सुमारे 5 हजार व्यापारी आहेत.

एपीएमसी मार्केटमधील आघाडीचे घाऊक फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले की, 15 फेब्रुवारीपासून हापूस हळूहळू बाजारात दाखल होण्यास सुरुवात होणार असली, तरी प्रत्यक्ष हंगाम खर्‍या अर्थाने 10 मार्चपासून सुरू होईल. गेल्यावर्षी हापूसला अवकाळीचा मोठा फटका बसल्याने हापूसची वारी 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात 450 पेट्यांची पहिल्यांदा आवक झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा यंदा हंगाम जोरात असेल आणि मार्चमध्येे दररोज सुमारे तीन ते साडेतीन लाख पेट्यांची आवक होईल, असे पानसरे म्हणाले.

 गेल्या तीन वर्षांत हापूसची उलाढाल 200 कोटींनी घसरली होती. गेल्यावर्षीचा हंगाम केवळ 50 दिवसांचा झाल्याने त्याचा परिणाम थेट उलाढालीवर झाला आणि ही उलाढाल 350 कोटींपर्यंत पोहोचली होती. यंदा मात्र हीच उलाढाल सुमारे 550 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

काय असतील दर?

यावर्षी हापूसचे दर फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात 7 ते 8 हजार रुपये पेटी असतील. मार्चमध्ये हेच दर 4 ते
5 हजार रुपये पेटी असण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणावर हापूस मुंबईत येणार असल्याने तो 2,000 ते 2,500 रुपये पेटी या दराने खरेदी करता येईल. गुढीपाडव्याला सर्वाधिक म्हणजे सुमारे 75 हजार ते
1 लाख पेट्या एपीएमसीत दाखल होण्याचा अंदाज आहे.

कोकण हापूसचे घाऊक व्यापारी कुठे आणि किती

मुंबई-800
पुणे-100
अहमदाबाद-100
राजकोट-50
सुरत-50
बडोदा-25
कोल्हापूर-100
सांगली-50
सातारा-25
अहमदनगर-10

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news