जळगाव : पुढारी वृत्तसेवा
एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालक जसं सांगतील, त्याप्रमाणे खडसे वागतात. ते परिवारात राहिले असते आणि जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार एकनाथ खडसेंवर टीका केली आहे.
जळगावात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. जळगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले असता, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार खडसेंवर निशाणा साधला.
आम्ही काळ्या झेंड्याना घाबरत नाही…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे लोक नाहीत. असे काळे झेंडे कितीही दाखवले तरी काही फरक पडणार नाही. आम्ही जनतेसाठी काम करत आहोत. जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही जळगावला आलो आहोत. जळगावची जनता आमच्याबरोबर आहे.
तर माझ्या हाताखाली काम का केले?- आमदार खडसे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपला त्यांनी जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालीशपणा आहे. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्व द्यावे असा सल्ला त्यांनी दिला. ते ज्या पक्षात आहे, त्या पक्षात असताना मी त्यांचा मालक होतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी अजित पवार त्यांचे मालक होते का? असा सवाल त्यांनी केला. आणि मी जर नालायक होतो तर इतके वर्ष तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला.