पुढारी ऑनलाईन: शरीरातील सर्वच हाडे ही कॅल्शिअम फॉस्फेटपासून बनलेली असतात. याच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊन हाडांचे आजार होतात; पण यावर मात करण्यासाठी अनेक डॉक्टर हे दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. याबरोबरच गुळ, शेंगदाणे, पालेभाज्या, कडधान्ये, अंडी खाण्यास देखील सांगितले जाते; पण नुकत्याच करण्यात आलेली संशोधनात एक आश्चर्यकारक नवीन माहिती समोर आली आहे की, तूर डाळीच्या सालीत दूधापेक्षा अधिक कॅल्शिअमचे प्रमाण असते.
इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ने यावर संशोधन केले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, तूर डाळीच्या सालीमध्ये दुधाच्या तुलनेत ६ पट अधिक कॅल्शियम असते. त्यामुळे, ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेट्सवर या आजारावरील उपचारासाठी अन्न आणि औषध तयार करणाऱ्या कंपन्या याला खास करून प्राधान्य देतात.
तूर डाळीच्या सालीमध्ये दुधापेक्षा अधिक कॅल्शियम असते. त्यामुळे तूर डाळीची साल ही बेबी फूड आणि अनेक प्रकारच्या हेल्दी सप्लिमेंटसाठी उपयोगी ठरू शकते. ICRISAT च्या जीनबँकच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळून आले की, १०० ग्रॅम तूर डाळीच्या बियाण्यांच्या सालीत ६५२ मिलीग्राम कॅल्शियम असते, १०० मिलीलिटर दुधात केवळ १२० मिलीग्राम कॅल्शियम असते. दूध आणि तूर डाळीच्या तुलनेत तूर डाळीच्या सालीत कॅल्शियमचे प्रमाण हे सर्वाअधिक असल्याचे इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यातून समोर आले आहे.
मानवी शरीराला दररोज 800-1,000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते, जे समकालीन भारतीय आहार देत नसल्याचे अहवाल म्हटले आहे. त्यामुळे दुधापेक्षा कित्येकपट साल असलेल्या तूरडाळीमध्ये कॅल्शियमची मात्रा सर्वाधिक असते. तूरडाळीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी हा घटक असतो. हा घटक रोगप्रतिकार शक्तीला उत्तेजित करतो. तसेच शरीराला कर्करोग, संसर्ग, किंवा इतर रोगांशी लढण्यास मदत करतात. तुरीची डाळ ही कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यास अशक्तपणा, थकवा, बधीरपणा आणि इतर व्याधी होऊ शकतात. त्यामुळे, आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करणे गरजेचे आहे.