जिल्हा बँकेची वाळकी शाखा चोरट्यांनी फोडली; सायरन वाजल्याने लुटीचा डाव फसला

जिल्हा बँकेची वाळकी शाखा चोरट्यांनी फोडली; सायरन वाजल्याने लुटीचा डाव फसला
Published on
Updated on

वाळकी(ता . नगर); पुढारी वृत्तसेवा : रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाल्याचा आणि अवकाळी पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क वाळकी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडली. मात्र बँकेची मजबुत असलेली तिजोरी अन् धोक्याची जाणीव करणारा सायरन वाजल्याने चोरट्यांचा डाव फसला. तिजोरीत असलेली पन्नास लाखांची रक्कम सुरक्षित राहिली . ही घटना गुरुवारी दि . २६ मध्यरात्री पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी वाळकी येथील बँकेची शाखा फोडण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने वाळकी परिसरात खळबळ उडाली आहे. बँकेचे शाखाधिकारी किसन गोपीनाथ सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, नगर तालुक्यातील वाळकी येथे रात्री अकराच्या दरम्यान वीज गेल्याने अणि अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने या परिसरात सामसुम पसरली होती. या दोन्ही बाबींचा फायदा घेत चोरट्यांनी बँकेच्या समोरील लोखंडी गेटचे कुलुप तोडून आतील शेटरला असलेले मजबुत लॉक कटावणीच्या साह्याने उचकटून बँकेत प्रवेश केला. आतमध्ये शाखाधिकारी यांच्या केबिनमध्ये असणारी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करताच धोक्याची सुचना देणारा सायरन वाजल्याने चोरट्यांनी तेथुन काढता पाय घेतला. गुरुवारी प्रजासत्ताक दिन असल्याने सकाळी सहा वाजता सेवा संस्थेचा शिपाई शंकरराजे भालसिंग झेंडा वंदनाची तयारी करण्यासाठी आले असता बँक फोडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. बँकेचे कर्मचारी यांना खबर देण्यात आली.

पोलीसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान बोलावण्यात आले. मात्र पाऊस झाल्याने माग काढण्यात अडथळे आले. पोलीसांनी सीसी टीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात तीन चार जण पंचवीस वयोगटातील असल्याचे दिसत असून पोलीसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष 
चार वर्षापुर्वी हीच शाखा फोडली होती. त्यावेळी पोलीसांनी बँकेच्या अधिकऱ्यांना येथे सुरक्षा रक्षक नेमण्याची सुचना केली होती. परंतु पोलीसांच्या सुचनेकडे बँकेने दुर्लक्ष केल्याने पुन्हा बँक फोडण्याची घटना दुसऱ्यांदा घडली. आतातरी बँक अधिकारी या घटनेचा बोध घेऊन सुरक्षा रक्षक नेमतील का?

चार वर्षात दोनदा बँक फोडीची घटना 
सन २०१९ मध्ये बँक फोडण्याची घटना घडली होती. त्यावेळीही सायरन वाजल्याने परिसरातील नागरीक जागे झाल्याने चोरट्यांना पळ काढावा लागला होता . त्यांनतर दि .२६ रोजी पुन्हा बँक फोडण्यात आली. यावेळीही सायरन मुळे चोरट्यांचा डाव फसला .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news