Lok Sabha Election 2024 | सर्वच पक्षांची अग्निपरीक्षा, जातीय समीकरणे काय आहेत?

Lok Sabha Election 2024 | सर्वच पक्षांची अग्निपरीक्षा, जातीय समीकरणे काय आहेत?
Published on
Updated on

दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. त्याचे कारण या राज्याचा अवाढव्य आकार आणि तेथील एकूण ऐंशी खासदार. या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकणार्‍या पक्षाला केंद्रात सत्ता मिळते, हे भारतीय राजकारणातील रुळलेले समीकरण होय. यावेळी मात्र उत्तर प्रदेशमध्ये तिरंगी लढत अटळ असल्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुका म्हणजे अग्निपरीक्षा ठरणार आहेत. असे असले तरी विस्कळीत झालेला विरोधी पक्ष ही भाजपसाठी जमेची मोठी बाजू म्हटली पाहिजे. (Lok Sabha Election 2024)

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात आठ मतदार संघांत मतदान होणार आहे. त्यासाठी सुमारे आठ कोटी मतदार सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनोर, नगीना, मुरादाबाद, रामपूर, पीलभीत येथे आपला मतदानाचा हक्क बजावण्यास उत्सुक आहेत. 2019 मध्ये या आठपैकी चार ठिकाणी भाजप, दोन ठिकाणी समाजवादी पक्ष आणि दोन ठिकाणी बहुजन समाज पक्षाने विजय मिळविला होता. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत रामपूर मतदारसंघ भाजपने समाजवादी पक्षाकडून काढून घेत शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपच्या खासदारांची संख्या पाच झाली. यावेळी भाजपला पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यांवर येऊन पडली आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उत्तर प्रदेशवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकांत सप, बसप आणि राष्ट्रीय लोकदल हे पक्ष एकत्र होते. यावेळी राष्ट्रीय लोकदलाने भाजपशी समझोता केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. राहुल गांधी आणि अखिलेश यादव पुन्हा एकत्र आल्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. त्याचवेळी बसपने 'एकला चलो रे' अशी भूमिका घेतली आहे. पश्चिम उत्तर प्रदेश बसपचे प्रभावक्षेत्र मानला जातो. तथापि, गेल्या दहा वर्षांत हा प्रभाव अतिशय क्षीण झाल्याचे दिसून येते.

भाजपपुढे कामगिरी राखण्याचे आव्हान

भाजपने 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व आठही जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत ही संख्या पाच झाली.

त्यामुळे यावेळी भाजपने या आठही जागांवर विशेष जोर लावला आहे. कारण, यावेळी विरोधी पक्ष विभागले गेले आहेत. नेमका याच स्थितीचा फायदा उठवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. शिवाय जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाला सोबत घेतल्यामुळे जाट मते भाजपकडे वळू शकतात. कारण, चौधरी यांना जाट समाजात मानाचे स्थान आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात एकेकाळी बेहनजी म्हणजे मायावती यांच्या बसपचा दबदबा होता. आता काळाच्या ओघात तो तसा राहिलेला नाही. गेल्या वेळी समाजवादी पक्ष आणि बसपची युती झाली होती. यावेळी हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. समाजवादी पक्षाने भाजपची बी टीम असा प्रचार बसपच्या बाबतीत चालविला आहे. अशा स्थितीत बसपला या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. तसे पाहिले, तर समाजवादी पक्षाची वाटदेखील काट्याकुपाट्यांनी भरल्याचे दिसून येते. सप आणि काँग्रेस यांनी समझोता केला असला, तरी गेल्या वेळी सहारनपूरच्या एकमेव जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता. यावेळच्या निवडणुकांची खासियत म्हणजे मुस्लिमबहुल मतदार संघांतही अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने हिंदू उमेदवार दिले आहेत. केवळ मुस्लिम मतांच्या आधारे निवडणुका जिंकता येत नाहीत, हे त्या पक्षाला कळून चुकले आहे.

जातीय समीकरणे महत्त्वाची

भेगाळलेला विरोधी पक्ष ही यावेळी भाजपसाठी सर्वात मोठी जमेची बाजू म्हटली पाहिजे. गेल्या वेळी पाच जागांवर जिंकलेल्या भाजपने यावेळी पश्चिम उत्तर प्रदेशातील आठही जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. वास्तविक गेल्या वेळी भाजपने ज्या तीन जागा गमावल्या, तेथे त्यांना अल्प फरकाने हार पत्करावी लागली होती. राजकीय निरीक्षकांच्या मते समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची मदार प्रामुख्याने मुस्लिम मतदारांवर आहे. बसपला दलित मतांबरोबरच मुस्लिम समाजाची मते मिळण्याची अपेक्षा आहे. कारण, केवळ दलित मतांच्या आधारे बसपला यश मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे काँग्रेस-सप आणि बसप यांच्यात मुस्लिम मतांसाठी संघर्ष होईल, हे ओघाने आलेच. अशा स्थितीत भाजपने दलित समाजाला आपलेसे केले, तर भाजपचा विजयरथ कोणीही रोखू शकत नाही.

गेल्या निवडणुकीत सहारनपूरमध्ये बसपने विजय मिळवला होता. यावेळी ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. तेथे इम्रान मसूद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बसप अर्थातच स्वतंत्र लढणार आहे. भाजपला या ठिकाणी गेल्या वेळी चोवीस हजार मतांनी हार पत्करावी लागली होती.

कैराना मतदार संघात भाजपने 2019 मध्ये विजय मिळवला होता. यावेळीही तेथे भाजपचे पारडे जड दिसत आहे. मुझफ्फरनगरमध्ये संजीव कुमार बालियन यांना भाजपने पुन्हा रिंगणात उतरवले असून, ते विजयाची हॅट्ट्रिक करण्याची अपेक्षा बाळगून आहेत. बिजनोरमध्ये गेल्या वेळी बसपने विजय मिळवला होता. भाजप तेव्हा दुसर्‍या स्थानी राहिला होता. यावेळी या मतदार संघात सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. नगीना मतदार संघात बसपने गेल्या वेळी विजय मिळवला होता. येथेही भाजप दुसर्‍या क्रमांकावर होता. यावेळी भाजपने ओम कुमार यांना मैदानात उतरविले आहे. समाजवादी पक्षाने मनोज कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मुरादाबाद आणि रामपूरमध्ये गेल्या वेळी समाजवादी पक्षाने बाजी मारली होती. यावेळी भाजपने तेथे घनःश्याम लोधी यांना उमेदवारी दिली आहे. पीलभीतमध्ये यावेळीदेखील वरुण गांधी यांचा दबदबा दिसून येतो. मात्र, 2004 पासून ही जागा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. बसपने तेथे अनीश अहमद खान यांना, तर समाजवादी पक्षाने भगवत सरन गंगवार यांच्यावर विश्वास टाकला आहे. मात्र, हा हक्काचा गड कोणत्याही स्थितीत भाजप आपल्या हातून जाऊ देणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. (Lok Sabha Election 2024)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news