आप नेते सिसोदिया, संजयसिंह यांना जामीन नाहीच

आप नेते सिसोदिया, संजयसिंह यांना जामीन नाहीच

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा धक्का बसला. न्यायालयाने दोन्ही नेत्यांची न्यायालयीन कोठडी ७ मार्चपर्यंत वाढविली आहे. दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात दोन्ही नेते तुरुंगात आहेत.

सीबीआयने सिसोदिया यांना गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर तिहार तुरुंगात सिसोदिया न्यायालयीन कोठडीत असताना ईडीने त्यांना आर्थिक अपहार प्रकरणात (मनी लॉन्ड्रींग) 9 मार्च 2023 रोजी अटक केली. दरम्यान, याच प्रकरणात राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने ४ ऑक्टोबरला अटक केली होती. अबकारी धोरणात मद्यविक्रेत्यांकडून लाच घेण्याच्या कटाचा संजय सिंग हिस्सा असल्याचे ईडीचे न्यायालयात म्हणणे होते.

केजरीवाल सरकारने महसूल वाढीसाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये आणलेल्या मद्य धोरणातील अनियमिततेबाबत जुलै २०२२ मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना अहवाल सादर केला होता. यात तत्कालिन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर मद्यविक्रेत्या परवानाधारकांना अवाजवी लाभ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

सीबीआय आणि ईडीचा आरोप आहे की, दिल्‍लीतील मद्य धोरणामुळे सरकारी तिजोरीचे १४४.३६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ३० जुलै २०२२ रोजी दिल्ली सरकारने अबकारी धोरण मागे घेतले होते. मात्र, या संपूर्ण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळाला नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news