गुडाळ (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी देखील ग्रामपंचायत गटात मतदार असलेल्या 300 हून अधिक ग्रामपंचायती मधील अडीच हजार हून अधिक सदस्यांची मुदत बाजार समितीच्या मतदानापूर्वीच संपत आहे. त्यामुळे नूतन ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी बाजार समितीची निवडणूक चार महिने लांबणीवर जाण्याचे संकेत राज्याच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी बुधवारी (दि.२३) मंत्रालयात एका बैठकी प्रसंगी दिले.
राज्यातील गटसचिवांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आ. प्रकाशराव आबिटकर यांच्या पुढाकाराने बुधवारी दुपारी मंत्रालयातील समिती कक्षात सहकार मंत्री ना. अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली गटसचिव संघटना प्रतिनिधी आणि सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कोल्हापूर जिल्हा बाजार समिती निवडणूक कार्यक्रम आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदान अधिकाराबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका या अनुषंगाने आ. आबिटकर यांनी प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे विचारणा केली असता, अनुपकुमार यांनी ही निवडणूक चार महिने लांबणीवर जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.
मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षी जाहीर झाला होता. मात्र विकास संस्थांच्या निवडी झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका व्हाव्यात अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आणि ही याचिका मंजूर होऊन राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या होत्या.
कोल्हापूर जिल्हा बाजार समिती कार्यक्षेत्रातील साडेसहा तालुक्यातील तीनशेहून अधिक ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर बाजार समितीसाठी 29 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत गटातील अडीच हजाराहून अधिक नूतन सदस्यांना मतदार यादीत नाव नसल्याने निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहावे लागणार आहे. विकास संस्था निवडणुक धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुकीनंतर बाजार समिती निवडणूक घ्यावी अशी याचिका नुकतीच उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेच बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम किमान चार महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आज खुद्द सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी याला दुजोरा दिल्याने कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा शासन निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.