खंडाळ्यात आ. रामराजे की आ. मकरंदआबा

खंडाळ्यात आ. रामराजे की आ. मकरंदआबा

लोणंद, शशिकांत जाधव : राज्याप्रमाणे खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. खा. शरद पवार की ना. अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या संघर्षात तालुक्यातील आ. रामराजे व आ. मकरंद पाटील यांचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रामराजेंनी उघड उघड अजितदादांना पाठिंबा दिला तर मकरंदआबांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन डगरींवर हात ठेवून राजकारण करणार्‍या कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे.

खंडाळा तालुक्यात आतापर्यंत सुप्त अवस्थेत असलेली आ. रामराजे गट व आ. मकरंदआबा गट यांच्या कार्यकर्त्यांत असलेली दरी यानिमित्ताने समोर आली आहे. या दोन्ही गटांत फूट पडली असल्याचे चित्र आहे. या घडामोडीनंतर रामराजे यांच्याबरोबर कोण व आ. मकरंद पाटील यांच्याबरोबर कोण? याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. एक संघ असणारी राष्ट्रवादी आगामी काळात दोन नेत्यांमध्ये दुभंगल्याचे चित्र खंडाळा तालुक्यातील राजकीय वर्तुळात पहावयास मिळणार आहे. आतापर्यंत एकत्रित असलेले दोन्ही गट एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत. त्यामुळे तालुक्यात एकहाती राष्ट्रवादीची असलेल्या सत्तेला सुरुंग लागण्यास वेळ लागणार नाही, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. खंडाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आ. रामराजे ना. निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी म्हणून एकत्रित काम करत होते. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीची सर्वच पातळीवर ताकद वाढत जाऊन विविध संस्थांवर सत्ता काबीज करण्यात आल्या होत्या.

यापूर्वीच्या काळात वाई, खंडाळा व फलटण, खंडाळा अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागले गेलेल्या खंडाळा तालुक्यात रामराजे व मकरंद पाटील यांची कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली होती. विधानसभेच्या फेररचनेनंतर संपूर्ण खंडाळा तालुका वाई तालुक्याला जोडला गेला. त्यामुळे फलटणपासून खंडाळा तालुका थोडासा दूर गेला. परंतु, आ. रामराजे यांचे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आजही कायम आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांना रामराजेंनी त्यांची कामे करून ताकत दिली आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.

दुसर्‍या बाजूला आ. मकरंद पाटील यांनी खंडाळा तालुक्यातील राजकारणावरील आपली पकड घट्ट बनवत गावागावांत कार्यकर्ते निर्माण करून कार्यकर्त्यांची नवी फळी निर्माण केली. या दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये अंतर्गत धुसफुसी आतापर्यंत सुरू होत्या. परंतु त्या सुप्त अवस्थेत होत्या. या दोन्हीही गटांना राष्ट्रवादी म्हणून रामराजे व मकरंद पाटील यांनी एकत्रित राहण्याचा सल्ला देत आले होते.

कार्यकर्त्यांमधील जाहीर वाच्यता फारशी होत नव्हती. एवढेच काय परंतु एका नेत्यांकडे गेलेले दुसर्‍या नेत्याला गेलेले खपत नसत. आता तर एकमेकांसमोर आल्याने वर्चस्व-वादाची लढाई चुरशीच होणार आहे.

गावच्या राजकारणामध्ये दोन्ही गटांमध्ये कुरघोड्या

दोन्ही गटातील कार्यकर्ते कायम एकमेकांवर गावातील, तालुक्यातील राजकारणात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोणंद बाजार समिती निवडणुकीमध्ये आला. आ. रामराजे गटाला उमेदवारीत डावलल्यानंतर त्याचे परिणाम मतदानाच्या आकड्यांमध्ये दिसून आले. आता दोन्ही गट आमने सामने आल्याने तालुक्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई चुरशीची पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news