कोल्हापूर : पाच आटणी दुकानांत चोरी; सहा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी लंपास

कोल्हापूर : पाच आटणी दुकानांत चोरी; सहा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी लंपास
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुजरीलगतच्या कासार गल्लीमध्ये बंगाली कारागिरांच्या पाच दुकानांची कुलपे उचकटून 6 तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी असा 4 लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. संशयित चोरटा मध्यरात्री तीन तासांहून अधिक वेळ परिसरात घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत करण्यात आली.

कासार गल्लीत स्थानिक कारागिरांसह बंगाली कारागिरांची आटणीची दुकाने आहेत. सोन्याचे दागिने, बिस्किटे, चांदीचे ऐवज बनविण्याचे काम येथे चालते. येथील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये बंगाली कारागिरांची पाच दुकाने आहेत. शुक्रवारी रात्री ही दुकाने बंद करून कामगार गेले होते. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास पांढरे कपडे परिधान केलेला संशयित तिथे आला. चोरट्याने सुमारे तासभर रेकी करून 1 वाजण्याच्या सुमारास बेसमेंटमध्ये प्रवेश केला.

येथील दुकानांची कुलपे तोडून ऐवज चोरला. पांडुरंग कारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दुकानातील 8 ग्रॅमची सोन्याची नथ, 40 ग्रॅम चांदीच्या बांगड्या, चांदीची नाणी, रामदास पोतदार यांची 580 ग्रॅम चांदी, 9 ग्रॅमची साखळी, लॉकेटमधील 3 खडे, अब्दुलहसन मिद्या यांचे 32 ग्रॅमचे सोन्याचे मनी, अनुप चौगुले यांचे 4 ग्रॅम सोने, 3.5 ग्रॅमचा सोन्याचा चुरा, रणजित भौमिक यांचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आली. जुना राजवाडा पोलिसांसह उपअधीक्षक संकेत गोसावी, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक रवींद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोने वितळवून नेले?

कासार गल्लीत मध्यरात्रीही काही कामगार काम करत असतात. बेसमेंटमध्ये येणार्‍या मुख्य दरवाजाला कुलूपच न लावल्याने चोरटा सहज खाली आला. त्याने दुकानांची कुलपे उचकटून सर्व सोने एकत्रित केले. येथे आटणी काढून त्याने सोने वितळवून सोबत नेल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली. याची खातरजमा करण्याचे काम सुरू होते. सोनारकामाची व परिसराची माहिती असणारा चोरटा माहीतगार असावा, असा कयास आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news