पुढारी ऑनलाईन डेस्क : सिल्क्यरा बोगद्यात १० दिवस अडकलेल्या ४१ कामगारांचे पहिले छायाचित्र मंगळवारी (दि. २१) समोर आले. सहा इंची पाईपमधून पाठवलेल्या एंडोस्कोपिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व कामगार सुरक्षित आढळल्याची माहिती रेस्कू ऑपरेशन टीमने दिली. तसेच वॉकीटॉकीच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधला. या पाईपद्वारे औषधी, संत्री, केळी, भाकरी, भाजी, पुलाव, मीठ मजुरांना पाठवले जात होते. या मजुरांना बाहेर काढण्याचे कार्य अंतिम टप्प्यात असून लवकरच या सर्वांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती माहिती रेस्कू ऑपरेशन टीमने दिली.
दरम्यान, कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लि. बोगद्याच्या आतून बचावावर लक्ष ठेवून आहे. अधिकारी महमूद अहमद यांनी आज (दि. २२) या बचाव कार्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असे सांगितले होते. यापूर्वी 22 मीटरपर्यंत पाठवण्यात आलेल्या 900 मिमी पाइपपैकी 800 मिमी पाइप टेलिस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे पाठवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
अधिकारी अहमद यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अमेरिकन ऑजर मशिनने खोदकाम सुरू करण्यात आलेल्या या ड्रिलचा वेग ताशी 5 मीटर आहे. मात्र काही अडचणींमुळे तो या वेगाने काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या बचाकार्यात आता अन्य कोणताही अडथळा न आल्यास गुरुवारी (दि. २३) कामगारांना बोगद्यातून बाहेर काढले जाण्याची शक्यता, अहमद यांनी व्यक्त केली.
उत्तरकाशीतील मजुरांसाठीच्या बचावकार्याला सध्या वेग आला असून हे रेस्क्यू ऑपरेशन लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. घटनास्थळी जवळपास २० रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढल्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
या घटनेमुळे बोगद्याच्या बारकोटच्या बाजूने कामाला सुरुवात झाल्याचे महामंडळाचे संचालक प्रशासक अंशू मनीष खालखो यांनी सांगितले. यामध्ये दोन चौरस मीटरचा बचाव बोगदा सुमारे आठ मीटर खोदण्यात आला आहे. मात्र, त्या टोकापासून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 325 मीटर ड्रिल करावे लागणार आहे.
हेही वाचा