कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज 8 फेब्रुवारीपासून होणार सुरू

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज 8 फेब्रुवारीपासून होणार सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज शुक्रवारपासून (दि 8) पुण्यात सुरू होत आहे. हे कामकाज 12 फेब—ुवारीपर्यंच चालणार आहे. या कालावधीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक असलेल्या हर्षाली पोतदार आणि पुण्याच्या विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची उलटतपासणी होणार आहे.
कोरेगाव भीमा येथे सन 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सुनावण्यांना महत्त्व आले आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक या दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.

या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकर, पोतदार आणि कदम यांना पाचारण करण्यात आले आहे.

हिंसाचार झाल्यानंतर आंबेडकर यांनी विविध आरोप केले होते. पोतदार या एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक आहेत, तर हिंसाचार झाला, तेव्हा कदम या हवेलीच्या उपविभागीय अधिकारी होत्या. त्यामुळे या तिघांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे.
आंबेडकर यांची उलटतपासणी 8 आणि 9फेब्रुवारी, पोतदार यांची 9 आणि 10 फेब्रुवारी, तर कदम यांची 12 फेब्रुवारी रोजी उलटतपासणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात काही बदल होऊ शकतात. मात्र, पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news