रांजणखळग्यात पाय घसरून महिला पडली

रांजणखळग्यात पाय घसरून महिला पडली
Published on
Updated on

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटनस्थळावरील रांजणखळगे पाहत असताना मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील एक महिला पाय घसरून पाण्यात पडली. उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता; मात्र महिलेचा शोध लागला नाही. पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) ही 55 वर्षीय महिला नातेवाइकांसोबत रांजणखळगे पाहत होती. पाय घसरल्याने ती पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेली. मात्र, तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठमोठे खड्डे असल्याने ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी, असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.

महिला पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले; मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली. सोबत असलेल्या नातेवाइकांनी आरडाओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजणखळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून, त्यांचा जीव थोडक्यात बचावला, असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.

कुंड पर्यटनस्थळ पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी आणि नगर जिल्ह्यातील निघोज या गावांच्या सीमेवर असून, निघोजकडून टाकळी हाजी हद्दीकडे येत असताना निघोज हद्दीत हा प्रकार घडला आहे. वाहत्या पाण्यामुळे शोध घेणे अवघड झाल्याने पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पोलिसांनी संपर्क साधला असून, सर्व जण पाणी बंद होण्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news