पुणे: नवले ब्रिज अपघात प्रकरणी मोठी माहिती हाती, ‘ट्रकचे ब्रेक फेल झालेच नव्हते’

पुणे: नवले ब्रिज अपघात प्रकरणी मोठी माहिती हाती, ‘ट्रकचे ब्रेक फेल झालेच नव्हते’

Published on

पुढारी ऑनलाईन: रविवारी रात्री पुण्यातील नवले पूलावर भीषण अपघात झाला. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या या अपघातात ट्रक चालकाने जवळपास ४० पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता तपासादरम्यान या मागे दुसरं कारण असल्याचं समोर आलं आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती मिळाली आहे. ट्रक चालकाने रस्त्याला उतार असल्याने इंजिन बंद केलं होतं आणि तो गिअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. पण नंतर वेळेवर ब्रेक दाबू न शकल्याने त्याने ४०पेक्षा अधिक गाड्यांना धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातात घटनास्थळावरुन फरार झालेल्या चालकाचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असं या चालकाचं नाव असून, तो मध्य प्रदेशचा आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर रविवारी रात्री ट्रकच्या धडकेने ४० वाहनांचं नुकसान झालं. या अपघातामध्ये जखमींची संख्या सुमारे ३५ ते ४० होती. तसेच किरकोळ जखमी झालेल्यांवर दवाखान्यात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या गंभीर असलेल्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वेगाने निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. दरम्यान सिंहगड रस्ता विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरटीओने वाहनाची तपासणी केली असता, ब्रेक फेल झालं नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चालकाने इंधन वाचवण्यासाठी रस्त्याला उतार असल्याने इंजिन बंद करत न्यूट्रल गिअरवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. नंतर ट्रकने वेग पकडल्याने चालक ब्रेक दाबू शकला नाही".

logo
Pudhari News
pudhari.news