Pune News : शिकावू विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले

Pune News : शिकावू विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले

जळोची : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील कटफळ येथे एमआयडीसीमधील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे विमान गुरुवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आहे. ते नक्की कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळू शकली नाही.

बारामतीत गेल्या काही वर्षांपासून विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. बारामती विमानतळाचा त्यासाठी वापर होतो. काही महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील एक शिकाऊ विमान कोसळले होते. त्यावेळी विमानाचे नुकसान झाले होते; मात्र त्यातील महिल पायलट प्रशिक्षणार्थी बचावली होती. ती घटना ताज असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे

अपघात झाल्यावर विमानाचे अवशेष झाकून ठेवण्यात आले. विमान कोणत्या संस्थेचे आहे हे कळू नये, हे कारण त्यामागे असावे, किंवा सुट्टे भाग चोरीला जावू नयेत, ही भूमिका त्यामागे असावी. विमान कोसळल्याच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. वैमानिक प्रशिक्षक शक्तीसिंग व इतर सहकारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

अपघाताचे कारण गुलदस्त्यात
या विमानाचा अपघात नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. तांत्रिक बिघाडाने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर येथे गर्दी वाढू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले. दरम्यान या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी बोलण्यास नकार दिला. काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवले.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news