
ठाणे : सिंधुसागराच्या अजस्र लाटा, परकीयांचे आक्रमण समर्थपणे परतवून लावणार्या विजयदुर्गची दुर्दशा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विकास आणि विस्तार केलेल्या या किल्ल्याच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाची डोळेझाक होताना पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याचे बुरुज गेले काही वर्षे ढासळत आहे. 14 ऑगस्टला विजयदुर्ग किल्ल्यावरील दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उद्भवू शकतो. हा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला असून, या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजाजवळील तटबंदी ढासळलेली होती. त्यावेळी पाहणी करायला आलेल्या लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने आजपर्यंत त्या बुरुजाची डागडुजी केलेली नाही.
1653 पासून 1818 पर्यंत किल्ल्यावर मराठ्यांचे वर्चस्व होते. किल्ला 820 वर्षे प्राचीन असून, 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला. त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने राज्य केले.
1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आदिलशहाकडून ताब्यात घेतला. विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर 5 एकराच्या क्षेत्रफळामध्ये वसलेला होता. पण, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले. किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. जमिनीवरून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो.