मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने चालवली जाणारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेले मनुष्यबळ महाराष्ट्र सुरक्षा दल (एमएसएफ) काढून घेण्याच्या तयारीत आहे. सुरक्षा हटवण्यामागे सरकारची 39 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे. ( Government Hospital )
संबंधित बातम्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांसह रुग्णांच्या कुटुंबीयांकडून मारहाणीचा मुद्दा गंभीर झाल्यानंतर राज्यातील सर्व 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमएसएफचे जवान तैनात करण्यात आले होते. परंतु, थकबाकीमुळे दोन दिवसांपूर्वी, एमएसएफने मुंबईतील जेजे रुग्णालय समूहाच्या जीटी, कामा आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांमधून आपले सुरक्षारक्षक मागे घेतले होते.
एमएसएफ शनिवारी जेजे हॉस्पिटलमधून आपली सेवा काढून घेणार होती. मात्र, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण 13 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. 13 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत थकबाकीबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास एमएसएफ इतर रुग्णालयांतील सेवा काढून घेईल, असे एमएसएफने रुग्णालय प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे.
जेजे हॉस्पिटल ग्रुपच्या निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या जेजे मार्डचे अध्यक्ष डॉ. संपत सूर्यवंशी यांनी सांगितले की, सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या नर्सिंग हॉस्टेलजवळ तैनात असलेल्या एमएसएफच्या सुरक्षा कर्मचार्यांना हटवण्यात आले आहे. या वसतिगृहात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांशिवाय प्रथम वर्षाची एमडी महिला निवासी डॉक्टरदेखील राहतात. या डॉक्टरांची ड्युटी सेंट जॉर्ज, जीटी किंवा जेजे रुग्णालयात रात्री लावली जाते, अशा परिस्थितीत सुरक्षा कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे येथील मेट्रन त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव रात्री 10 नंतर वसतिगृहातून बाहेर पडू देत नाहीत. या कारणांमुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात रुग्णालयाच्या अधीक्षकांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी एमएसएफने जीटी, सेंट जॉर्ज आणि कामा येथून आपल्या सेवा काढून घेतल्या आहेत आणि शनिवारपासून जेजे रुग्णालयातील सेवाही मागे घेणार आहेत. तूर्तास हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जीटी, सेंट जॉर्ज आणि कामा येथे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येत्या 13 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेणार आहे. या बैठकीनंतरच एमएसएफ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधून सेवा काढून घेण्याचा निर्णय घेईल. ( Government Hospital )