मुंबई; नरेश कदम : 'इंडिया' आघाडीत लोकसभा निवडणुकीचे जागावाटप हा कळीचा मुद्दा राहणार असला, तरी हे अधिकार राज्याच्या नेतृत्वाकडे देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतले दोन पक्ष तुटले असल्याने जागावाटपासाठी कोणते निकष लावायचे, यावरून आघाडीत गोंधळाची स्थिती आहे.
'इंडिया' आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. जागावाटप हाच आघाडीत मुख्य कळीचा मुद्दा होणार असल्याची चर्चा आघाडीच्या नेत्यांनी केली. यात जागावाटपाचे अधिकार राज्यातील नेतृत्वाला देण्यात यावेत, असा मुद्दा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडला. सर्वच घटकपक्षांच्या नेत्यांनी तो मान्य केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटले आहेत. शरद पवार यांच्या गटाकडे सध्या चार खासदार आहेत. एक खासदार अजित पवार यांच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे 5 खासदार सध्या आहेत; तर 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. काँग्रेसचे एक खासदार बाळू धानोरकर हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते. परंतु, त्यांचे निधन झाले.
महाविकास आघाडीच्या दहा जागा वगळून उर्वरित जागांवर जागावाटपाची चर्चा होईल. यातही उद्धव ठाकरे गटाने 19 जागांची मागणी केली आहे. यात 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या 18 जागांचा समावेश आहे; तर राष्ट्रवादी शरद पवार गट 2019 मध्ये जिंकलेल्या पाच जागांसह 15 जागांवर दावा करत आहे. यात 2019 च्या निवडणुकीत दुसर्या नंबरवर ज्या जागांवर राष्ट्रवादी पक्ष होता त्या जागा त्यांनी मागितल्या आहेत.
यात परभणी, जालना, उस्मानाबाद, मावळ, इचलकरंजी, ईशान्य मुंबई, ठाणे, कल्याण, अहमदनगर, नाशिक, माढा, कोल्हापूर, रावेर, गोंदिया, अमरावती, बुलडाणा या जागा 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविल्या होत्या.
यात परभणी, जालना, धाराशिव, मावळ, इचलकरंजी, अहमदनगर, नाशिक, माढा, कोल्हापूर, रावेर, गोंदिया, अमरावती, या जागा शरद पवार गटाला हव्या आहेत. बुलडाणा, अमरावती, मावळ, नाशिक, धाराशिव या जागांवर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एक खासदार निवडून आला होता; पण त्यांनी 24 जागांवर दावा करण्याचे ठरविले आहे. ज्यांचे आमदार ज्या लोकसभा मतदारसंघात सध्या जास्त आहेत तो पहिला निकष लावला पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे; पण काँग्रेस फुटलेली नाही. ही त्यांची जागावाटपात जमेची बाजू आहे. त्यामुळे मेरिटबरोबर विद्यमान आमदार जास्त यावर काँग्रेस जागावाटपाच्या चर्चेला बसणार आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाडा या विभागातील जास्त जागा घेण्याचे त्यांचे प्रयत्न
आहेत.
1) महाराष्ट्रात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, अमरावती, संभाजीनगर,
शिर्डी आदी जागांवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
2) 'इंडिया' आघाडीत पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांत काँग्रेस आणि 'आप' यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
3) केरळमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षात संघर्ष होईल.
दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यात वादाची शक्यता आहे.