श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे महाराष्ट्रकर्नाटकासह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी पहाटे 4.19 तेे 6.40 या वेळेत नाथांची मुख्य भाकणूक झाली. वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे (महाराज) यांच्या उपस्थितीत त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली.
पाच दिवसांपासून सुरू असणारी ही यात्रा यंदा कोरोनामुळे प्रशासनाने केवळ मानकरी व कुर्ली – आप्पाचीवाडी या दोन गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावपातळीवर साध्या पद्धतीने पार पडत आहे. सोमवारी (दि.25) उत्सवस्थळी बसलेली पालखी उठल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.
नाथांच्या भाकणुकीतून यंदा नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोणे महाराज म्हणाले, देशात समान नागरी कायदा येईल. आगामी वर्षाचा दिवस आनंदात दावीन, भारत-पाक सीमेवर रणधुमाळी अटळ राहील. एक महिन्याचे पीक येईल, तापमानाच्या उच्चांकात वाढ होऊन जंगलांना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील. वस्त्रोद्योग अडचणीत येईल, सुताचा दलाल दिवाळ काढील. गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील, पावसापाण्यामुळे ऋतुमानात बदल होईल. बहीण-भावाच्या नात्याला कलंक लागेल.काँग्रेस पक्षात फूट पडेल. राजकारणात भगवा फडकेल.
कडधान्य उदंड पिकेल
कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडून चौथाई हिस्सा जलमय होईल. देशात जाती-धर्मात तेढ निर्माण होईल. कडधान्य उदंड पिकेल. देशातील पाऊसमान, पीक पाणी, तेजीमंदी, नैसर्गिक आपत्तीमध्ये बदल होईल. मेघयान माळा, आकाशाच्या फळा, मेघराजा उदंड हाय. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रीय वंशाचे आहे. भोंबेच्या पुणवेला माझा सोहळा निघतोय. वाडी-कुर्लीतील खडकाच्या माळाला फार वर्षापूर्वी आसन टाकलंय.
सबिन्यात फूट पाडशीला यमपुरी बघशीला
पिवळ्या भस्माचा महिमा वाढत चाललाय. तिरूपती बालाजीचा येथे अवतार आहे. कुर्ली-आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल. वाडी-कुर्लीच्या आवारात नाथांचा दरबार भरलाय. हालसिद्धनाथांचा त्रिभुवनाथ जयजयकार चाललाय. वाडी-कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरीला जाशीला.
पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारंल. तीनवा मोगरा राज्य करंल. तुम्ही बघाल. अश्विनी, भरणी, कात्या, कृतिका, रोहिणी, मृगाच्या बणी, सरती रोहिणी निघता मिरग. कुरी कोकण भागात मिरवंल.
चार्याला सोन्याचा भाव येईल
रोहिणीची पेरणी त्याला हादग्याची पुरवणी होईल. देवयान धान्य मध्यम पिकंल. राजयान धान्य उदंड पिकंल. खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणता शेरावर येईल. शेर म्हणता मापट्या-चिपट्यावर येईल. खरीप-बोरीप बहूत उदंड पिकंल. तांबडी रास मध्यम राहील. काळी रास सुफळ जाईल. पांढरी रास उदंड पिकंल. तांबडी कळी मध्यम पिकंल, ताजव्यातून विकंल. वैरण सोन्याची होईल, सांभाळून र्हावा, सूर्य-चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल.
सीमाभागात अतिरेकी गोंधळ घालतील
सीमाप्रश्न चर्चेत राहील. निपाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील. जाळपोळ होईल. दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने राजकारणाला कलाटणी मिळंल. गायी-म्हशींचा भाव वाढत जाऊन गगनाला भिडंल. उसाचा भाव वाढत राहील. नदीकाठची जमीन ओसाड पडंल. बारा वर्षाची मुलगी आई होईल. उगवत्या सूर्यालाही संकट पडलंय.
आलम दुनियेचा चौथाई भाग ओसाड पडेल
सरकी फुकाची, मेंढी मोलाची होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल. आलम दुनियेचा चौथा कोना ओसाड पडंल. बैलाची किंंमत बकर्याला येईल. बकर्याची किंमत कोंबड्याला येईल. मांसाहारापासून
मनुष्याला रोग वाढत राहील.
पृथ्वीचा करार संपत आलाय
नदीबाईजवळ सत्पण आहे. वीजबाईचा मोठा कल्लाटा होईल. समुद्राची संपत्ती नाश पावंल. स्मगलर लोकांच्या हत्या होतील. शेषाच्या फडीवर धरतीमाता डळमळू लागली आहे. पृथ्वीचा करार संपत आलाय. दिवसाआड दिवस पाप वाढत चाललंय. पाण्याचा कप विकंत मिळंल. पाळी लागंल. लाकूड सोन्याचं होईल. ताजव्यातून विकंल.
शहराची वस्ती विरळ होईल
गोरगरिबांना जगणे मुश्कील होईल. बॉम्बस्फोट, वादळं, भूकंपामुळे समुद्र व देशाची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठावर नऊ लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील. 10 सें.मी. कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल. शहराला लागून असलेली शहरे खेड्याप्रमाणे होतील.
उशाची भाकरी उशाला राहील
तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. कळपातला बकरा कळपात लढेल. माईचे लेकरू माईला ओळखणार नाही. गायीचे वासरू गायीला भेटणार नाही. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला. चालता-बोलता मनुष्याचा प्राण जाईल. माझं, माझं म्हणू नका. हे भ्रांतीचं ओझं आहे. घरातील लक्ष्मी दडून बसेल. रानातील लक्ष्मी पळून खेळेल. कोकणचा बसव्या, देशाचा बसव्या सरहद्दीवर येतील. दोघांची देशाच्या सरहद्दीवर टक्कर होईल.
करशीला सेवा, खाशीला मेवा
सातार्याच्या गादीवर फुले पडतील. गोसाव्याची पांढर हाय. गोसाव्यांच्या पांढरीत तुम्ही एकीने वागावे, गर्वाने वागू नये. गर्वाने वागशीला तर फसून जाशीला. गर्वाचे घर खाली हाय. मी थोर, तू थोर म्हणू नका. करशीला सेवा तर खाशीला मेवा, अशाप्रकारे डोणे महाराजांनी भाकणूक कथन केली.