Saffron mango : केशर आंबा उत्पादक होणार मालामाल

Saffron mango : केशर आंबा उत्पादक होणार मालामाल
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत आंब्याला मोहर येतो; मात्र यंदा ऑक्टोबरपूर्वी आंब्याला नवीन पालवी आणि मोहर आला. त्यामुळे यंदा केशर आंबा मार्चमध्येच बाजारात येणार आहे. सध्या केशर आंब्याच्या बागा जोमात असून, केशरचे चांगले उत्पादन होईल. केशर लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. प्रीमियम रेट मिळणार असल्याने केशर आंबा उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे.

राज्यात केशरचे दहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. केशर एकरी आठ-नऊ टन पिकतो. यंदा 90 हजार टन केशर आंब्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये आंबा लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. मराठवाड्यात 14 ते 14.50 हजार हेक्टरवर आंब्याची लागवड आहे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55 आंबा बागायतदार शेतकरी आहेत. केशर आंबा लागवडीमध्ये सुधारणा झाली असून 1.5 बाय 4 मीटर एवढी अतिघनदाट लागवड केली जात आहे. त्यामुळे अधिक उत्पादन होत असल्याने केशर आंबा उत्पादक शेतकर्‍यांना अच्छे दिन असल्याचे महाकेशरचे तज्ज्ञ संचालक तथा उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले.

गुजरातपेक्षा महाकेशर दर्जेदार

गुजरातमध्ये केशरचे आठ ते दहा लाख टन उत्पादन होते. हा केशर आंबा एप्रिल महिन्यामध्ये बाजारात येतो. महाराष्ट्रातील केसर आंब्यात गोडी, फ्लेवर, टिकाऊपणा अधिक आहे; परंतु महाराष्ट्रातील आंबा काढण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे गुणवत्ता असूनही चांगला भाव मिळत नाही. यंदा मात्र महाराष्ट्रातील केशर आंब्याला मोहर लवकर लागल्यामुळे तो लवकर बाजारात येणार आहे.

निर्यातीसाठी तारेवरची कसरत

अमेरिका, जपान, इंग्लंड आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये केशरला अधिक मागणी आहे. निर्यातीमध्ये इतर आंब्यापेक्षा केशर टॉपला आहे. यंदा 2 हजार टनांपर्यंत केशरची निर्यात होण्याची शक्यता आहे; मात्र केशर आंबा निर्यातीसाठी युरोपियन राष्ट्रांत 220 रुपये, तर अमेरिकेसाठी तीनशे ते साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे खर्च येतो. पाकिस्तान आंबा निर्यातीसाठी 30 ते 40 टक्के सूट देतो; मात्र आपल्याकडे सवलत सोडा, अनधिकृत अडथळ्यांना सामोरे जावे लागते. निर्यातीसाठी शासनाकडून पाठबळ मिळत नाही. परिणामी, आंबा निर्यात करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे डॉ. कापसे म्हणाले.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाही केशरचे उत्पादन साधारण राहणार आहे. भावही तुलनेने सरासरी असेल. एप्रिलनंतर गुजरातचा आंबा बाजारात येत असल्याने भाव घसरतात; परंतु यावर्षी केशर लवकरच बाजारात येणार असल्याने केशरला प्रीमियम रेट मिळणार आहे. त्यामुळे केशर यंदा शेतकर्‍यांना मालामाल करेल.
– डॉ. भगवानराव कापसे, संचालक, महाकेशर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news