Air pollution : प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 17 शहरांना वायू प्रदूषणाचा धोका असून खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या 17 शहरांमध्ये कोल्हापूरसह सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, जळगाव, जालना, अकोला, लातूर, बदलापूर, उल्हासनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

वायू प्रदूषणामुळे होणार्‍या तीव्र आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत असून प्रत्येक शहरातील सेंटिनल रुग्णालयांच्या आपत्कालीन युनिटमध्ये श्वसनासंबंधी आजारांची नोंद ठेवण्यात येणार आहेत. संबंधित शहरांमध्ये नोंदविलेले दैनंदिन एक्यूआय पातळी व श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.

वायू प्रदूषणाशी संबंधित आजार आणि त्यांच्या मृत्यूची आकडेवारी नोंदवणे, आरोग्य सुविधाद्वारे आणि शहरांद्वारे आकडेवारी संकलित करून एनसीडीसीच्या, एनपीसीएचएच कार्यक्रम विभागाच्या ई-मेलवर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्यूआय पातळी आणि असुरक्षित लोकसंख्येच्या घनतेनुसार हॉट स्पॉट ओळखून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्याचे आदेशही दिले आहेत.
वायू प्रदूषणामुळे खोकला, छातीत घरघर, डोळे, नाक आणि घशात जळजळ, तीव्र श्वसन नलिकेचे आजार यासारख्या तीव्र आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच हाय रिस्क असलेल्या रुग्णांना श्वसनमार्गाची जळजळ आणि संसर्ग, दम्याचा त्रास, हृदयरोग आणि सेरेब्रोव्हस्क्युलर स्ट्रोकसारख्या आजारांची तीव्रता वाढून गंभीर परिणाम जाणवू शकतात. प्रदूषणाच्या कमी पातळीच्या दीर्घकालीन संपर्कामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तीव्र आजार, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अकाली मृत्यूचाही धोका असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news