पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच भाषणात शहबाझ शरीफ यांनी काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "काश्मीर जनतेला पाकिस्तान 'राजनैतिक व नैतिक पाठिंबा' देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करेल." असं असूनही या भाषणानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शहबाझ शरीफ यांना शुभेच्छा दिला आणि दहशतवादमुक्त प्रांत ठेवण्यासाठी दोन्ही देश काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शहबाझ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तत्पुर्वीच त्यांनी आपल्याला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, मात्र काश्मीर मुद्दा सुटल्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही, असे सांगितले होते. राजकीय उलथापालथीनंतर इम्रान खान यांना हटवून पंतप्रधानपदी आलेले ७० वर्षांचे शहबाझ यांनी पंतप्रधान होण्याच्या काही तास आधीच काश्मीरबद्दल वक्तव्य केले होते. दरम्यान ते पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचं अभिनंदन. भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असं झाल्यास आपण विकास कामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचं भलं करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल", असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे.
शाहबाज यांनीही काश्मीर मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे यावे, जेणेकरून दोन्ही देश सीमेच्या दोन्ही बाजूंला असलेल्या गरिबी, बेरोजगारी, औषधटंचाई आणि इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील, असेही मत शरीफ यांनी नोंदवले आहे. "आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत, आपल्याला त्यांच्यासोबत राहावेच लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासून आमचे भारतासोबतचे संबंध दुर्दैवाने कधीही चांगले राहिलेले नाहीत. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने अनुच्छेद ३७० रद्द केला तेव्हा इम्रान खान यांनी गंभीर व राजनैतिक प्रयत्न केले नाहीत. काश्मिरी लोकांचे रक्त काश्मीरच्या रस्त्यांवर वाहात असून त्यांच्या रक्ताने काश्मीर खोरे लाल झाले आहे", शहबाझ शरीफ म्हणाले.