नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली आहे. शुक्रवार (दि. 15) सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. (Petrol Diesel Price Today)
या निर्णयामुळे दिल्लीतील प्रतिलिटर पेट्रोलचा दर 94.72 रुपये, तर डिझेलचा दर 87.63 रुपये राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात कपात होणार असल्याची चर्चा सुरू होती. दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांनी दरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे गेल्या दोन वर्षांत पेट्रोल, डिझेल दरात कपात झाली नव्हती. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतून सिलिंडरचे गॅसचे दर कमी केल्यावर विरोधी पक्षांनी टीका केली. (Petrol Diesel Price Today)