जीवनदायिनी इंद्रायणी भोगतेय नरकयातना !

जीवनदायिनी इंद्रायणी भोगतेय नरकयातना !

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  लोणावळ्यापासून ते मरकळ, तुळापूरपर्यंत दोन्ही काठांलगतच्या गावांना 'सुजलाम सुफलाम' करणारी इंद्रायणी नदी आज कठीण यातना भोगताना दिसत आहे. केमिकलयुक्त सांडपाण्याने नदीचे प्रदूषण वाढले असून नदीतील जीवसृष्टी तसेच लगतची शेतीदेखील धोक्यात आली आहे. जानेवारीपासून तर नदीत फेस वाहून येणे नित्याचेच झाले आहे. दुसरीकडे नदी सुधार प्रकल्प आराखडा केंद्राकडे मान्यतेसाठी रखडला आहे. तो तातडीने मंजूर व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.

इंद्रायणी नदी 70 किलोमीटरच्या परिसरात पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. येथील जलचरदेखील धोक्यात आले आहेत. नदीत दिवसाआड केमिकलयुक्त फेस येत आहे. नदीच्या पाण्याचा वापर आता फक्त शेतीसाठीच होत आहे. ते पाणीही पिकांना उपयुक्त नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे केमिकलयुक्त सांडपाणी नदीत येऊ लागले आहे. त्यातच शहरातील कचरा नदीकाठी साठू लागला आहे. त्यामुळे नदीला उतरती कळा लागली आहे.

साधारण 1980च्या दशकात इंद्रायणी नदीवर लोणावळ्यापासून ते मरकळपर्यंत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारण्यात आले. त्यामुळे आळंदीसह मोशी, चिंबळी पंचक्रोशीतील जमिनीला सोन्याचे भाव आले. हा भाग शेतीपासून काहीसा दूर झाला. मात्र ज्या नदीने सोन्याचा घास दिला तिला तो विसरला नसून येथील प्रत्येक जण नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, याबाबत आग्रही आहे.

आळंदी, मोशी, चिंबळी भागाला इंद्रायणी नदीने समृद्ध केले. चिंबळी येथे 1984 ला नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यात आला. त्याने खर्‍या अर्थाने पंचक्रोशीत सुफलता आली. येथील शेती फुलू लागली. शेतकर्‍यांच्या हातात नगदी पिकामुळे पैसा येऊ लागला. मात्र नदीचा सर्वांना विसर पडू लागला आहे. यावर केंद्राने तातडीने उपाययोजना कराव्यात. रखडलेला नदी सुधार प्रकल्प तातडीने मंजूर व्हावा; अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव अवघडे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news