पुढारी ऑनलाईन डेस्क : सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' ( Shyamchi Aai ) हा चित्रपट अखेर आज शुक्रवारी (दि.१० )पासून सिनेमा गृहात चाहत्यांच्या भेटीस आला आहे. टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण भारावले आहेत. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत. 'श्यामची आई' चित्रपटातील गाण्यांची, शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांनी या चित्रपटातून संगीत दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.
संबंधित बातम्या
'श्यामची आई' चित्रपटात साने गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..' ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन चाहत्यांसमोर नविन गाण्याच्या स्वरूपात महेश काळे यांनी आणले आहे. 'हे गाणं नसून एक प्रार्थना आहे, नव्हे एक संवेदना आहे. हे गाणं प्रत्येकाच्या मनात बसलं पाहिजे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केलेयत' असे त्यांनी मत मांडले आहे. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी महेश काळे यांनी गायलेली 'खरा तो एकाची धर्म' ही प्रार्थना जगभरातील सर्व शाळांसाठी खुल्ली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
बहुचर्चित 'श्यामची आई' ( Shyamchi Aai ) या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब, अजय, अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपट आज चाहत्यांच्या भेटीस आला आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.
'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर याच्या भूमिका साकारल्या आहेत.