सोलापूर : बेकायदेशीर मुरूम उपसाचा मुद्दा विधानसभेत गाजला

सोलापूर : बेकायदेशीर मुरूम उपसाचा मुद्दा विधानसभेत गाजला
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या वनक्षेत्रामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड आणि मुरूम उपसा होत असल्याची वृत्तमालिका 'दैनिक पुढारी'मध्ये प्रकाशित झाली होती. याची दखल घेत आ. सुभाष देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मुद्दा मांडला. यामुळे 'दैनिक पुढारी' विधानसभेच्या अधिवेशनात झळकला आहे.

दैनिक 'पुढारी' ने जानेवारीपासून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर यासह अन्य तालुक्यात असलेल्या वनक्षेत्रातील मुरूम उपसा मोठ्या प्रमाणात करत असल्याच्या वृत्तमालिका प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना तोंडी ताकीद देण्यापलीकडे कोणतीच कारवाई केली नव्हती. आ. सुभाष देशमुख यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बेकायदेशीर मुरूम उपसा संदर्भात आवाज उठवून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. स्थानिक ग्रामपंचायतींना रॉयल्टी न देता विकासकामे किंवा रस्ता करण्याची हमी देत ठेकेदार मुरूम उपसा करतात आणि काम करत नाहीत असा मुद्दाही देशमुख यांनी उपस्थित केला.

विकासकामांच्या अपेक्षापोटी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सरपंच याबाबत तक्रारही करत नाहीत. यामुळे वन विभाग हद्दीतील मोठ्या प्रमाणात मुरमाचा उपसा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुरूम उपसा व वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडत असून दुर्मिळ आणि औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागामध्ये असे प्रकार घडत नाहीत. घडत असल्यास योग्य नाही. अशा प्रकारावर वन विभाग नक्कीच कारवाई करेल.

होणाऱ्या प्रकाराकडे बघत न बसता वन विभागाने संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करून असे प्रकार लक्षात आणून द्यावे, अशी सूचना वन विभागाला केली. वन विभागातून मुरूम उपसा करता येत नाही. रॉयल्टीसुद्धा वन विभागाला घेता येत नाही. रॉयल्टी घेऊन मुरूम उपसा करण्यासाठी परवाना घ्यायचा असल्यास संबंधित वनक्षेत्राला निर्वनीकरण करण्याचा परवाना मंजूर करून घ्यावा लागेल. तो परवाना घेता येत नाही असे ते यावेळी म्हणाले.

आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित केलेला मुद्दा पर्यावरण संवर्धन व संतुलनासंदर्भात असल्याने हा महत्त्वाचा विषय आहे. याबाबत वन विभागाला दक्षता घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा ठेकेदाराला वन विभागातून मुरूम उपसा करता येणार नाही. तसे घडत असल्यास वन विभाग स्वस्थ बसणार नाही, अशी हमी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दैनिक 'पुढारी'च्या वृत्तमालिकेवरून लक्षवेधी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ. सुभाष देशमुख यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना म्हणाले, सन्माननीय सदस्यानी दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारावर लक्षवेधी मुद्दा मांडला आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा त्यांचा चांगला हेतू आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news