अकोला : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. मनमर्जी कारभार सुरु आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक करून सरकार स्थापन केले आहे. यांना कुणाचेही काही घेणे देणे नाही. इकडे बळीराजा अडचणीत असताना अद्याप नुकसानभरपाई दिलेली नाही. आमच्यापासून दूर गेलेल्या काही गद्दारांच्या भरवशावर स्थापन झालेले हे सरकार घटनाबाह्य आहे. लवकरच हे सरकार कोसळेल, असे सुचक विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे अकोला दौ-यावर असताना त्यांची बाळापुरात सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे यांच्या 'शेतकरी संवाद' यात्रेची सोमवारी (दि.7) अकोल्यातून सुरुवात झाली. राज्यातील अकोला, बुलडाणा आणि संभाजीनगर या ठिकाणी शेतक-यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
तुम्हाला जनतेने गद्दार म्हणून नाही, राज्यकर्ते म्हणून स्वीकारल असेल, तर तुम्हाला चॅलेंज देतो, मी राजीनामा देतो, तुम्ही ४० जण राजीनामा देऊन निवडणुका घ्या, बघुया जनतेचा काय कौल आहे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटाला दिले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेता दिगंबर दानवे, खासदार अरविंद सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, सेवकराम ताथोड यांच्यासह शिवसेना जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही नजरेत नजर घालून सांगू शकतो, आमच्या मनात मान, सन्मान, प्रेम निष्ठा आहे. तर दुस-या बाजूला 40 गद्दार लोक, पळून गेले आहेत, तुम्ही कोणाच्या सोबत आहात? असा सवाल उपस्थित जनतेला करत रणरणत्या उनात तुमचं प्रेम खरं नसतं. तर आला नसता, पण तुम्ही प्रेम द्यायला आलाय, त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आभार मानले.
अकोल्यात पोहोचताच आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांवर प्रचंड श्रद्धा ठेवणा-या नेहरू पार्क चौकातील मुरली सुर्वे या चहावाल्याची भेट घेवून गौरव केला. यावेळी त्यांनी चहाचा आस्वादही घेतला.
अकोला येथून बाळापूरला जाताना त्यांनी जुने शहरातील श्री. राजराजेश्वराला अभिषेक घालून दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना केली.
हेही वाचलंत का ?