T-20 : भारत-दक्षिण आफ्रिकेचा पाचवा सामना पावसामुळे रद्द

T-20 : भारत-दक्षिण आफ्रिकेचा पाचवा सामना पावसामुळे रद्द

बंगळुर : वृत्तसंस्था :  पाचवी लढत जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टी-20 मालिका जिंकण्याच्या ऋषभ पंतचे स्वप्न पावसात वाहून गेले. रविवारी बंगळूर येथील चिन्‍नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणारी पाचवी लढत पावसामुळे रद्द करावी लागली. पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 लढत 50 मिनिटे उशिराने सुरू झाली आणि 3.3 षटकांचा सामना झाल्यानंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. पाऊस थांबायची चिन्ह न दिसल्याने सामना रद्द करण्यात आला आणि ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना रविवारी बंगळुरू येथे खेळवण्यात आला. हा सामना जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकणारा ऋषभ पंत हा पहिला भारतीय कर्णधार ठरला असता. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही.

पाचव्या सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आली नाही. ईशान किशनने पहिल्या षटकात दोन षटकारांसह 16 धावा केल्या; परंतु दुसर्‍या षटकात लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला आणि भारताला 27 धावांत 2 धक्के बसले. पावसामुळे हा सामना आधिच 19-19 षटकांचा करण्यात आला होता.

या मालिकेत 200 हून अधिक धावा करणारा ईशान हा पहिलाच फलंदाज ठरला. पण, लुंगी एन्गिडीने दुसर्‍या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला धक्‍का दिला. एन्गिडीने टाकलेला स्लोव्ह यॉर्कर खेळण्यास ईशान चुकला अन् त्याचा त्रिफळा उडाला. 7 चेंडूंत 15 धावा करून तो माघारी परतला. ऋतुराजकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तोही चौथ्या षटकात एनगिडीच्या स्लोव्ह चेंडूवर फसला अन् 10 धावांवर झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर जो पाऊस सुरू झाला तो थांबलाच नाही.

भुवनेश्‍वरकुमार मालिकावीर

पहिल्या चार सामन्यांमध्ये सहा बळी मिळवणार्‍या भुवनेश्‍वर कुमारला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला. कुमारने आतापर्यंत शानदार गोलंदाजी करून आफ्रिकन फलंदाजांना अडचणीत आणले होते. 'एक गोलंदाज म्हणून मालिकावीरचा सन्मान मिळणे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात जास्तीत जास्त एकाग्र राहून कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल,' अशी प्रतिक्रिया कुमारने दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news