रायगड ; पुढारी वृत्तसेवा महाड नगरपरिषदेच्या मालकीच्या लाडवली येथील डम्पिंग ग्राउंडला आज (रविवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली. या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान पहाटे झालेल्या या प्रकाराने नागरिकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती प्राप्त झाली असून, मागील वर्षभरात दुसऱ्यांदा लागलेल्या या अग्निकांडा संदर्भात संशय व्यक्त होत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक सरपंच सौ मुबिना निसार ढोकले यांनी केली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी या ठिकाणी लागलेल्या मोठ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते.
या विषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आवश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा अभाव असल्याचे मागील आगीच्या प्रकारानंतर उघड झाले होते. पहाटे चार वाजता आग लागल्याचे लक्षात येताच येथील सुरक्षा रक्षकांनी तातडीने आपल्या ठेकेदाराला याबाबतची माहिती दिली. यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला तातडीने पाचारण करण्यात आले.
या आगीचे वृत्त समजताच नगरपालिकेच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रयत्न केले. मात्र मागील वर्षभरात दुसऱ्यांदा लागलेल्या या आगीचे कारण काय, याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, नगरपरिषदेच्याच यंत्रणे अंतर्गत झालेल्या हा प्रकार धक्कादायक आहे. या आगीची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक सरपंच मुबिना निसार ढोकले यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान स्थानिक ग्रामस्थांकडून या संदर्भात संशय व्यक्त केला जात असून, या विषयी ठेकेदाराकडे विचारणा करावी अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा :