बहार विशेष : निवडणुकांच्या रणांगणात ‘सोशल मीडिया’चा प्रभाव

बहार विशेष : निवडणुकांच्या रणांगणात ‘सोशल मीडिया’चा प्रभाव
Published on
Updated on

समाजमाध्यमांचे विश्व व्यापक बनले असून, अनेक नवनवीन संकल्पना आणि प्रवाह यामध्ये आकाराला येत आहेत. अलीकडच्या काळात सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर हा शब्दप्रयोग खूप लोकप्रिय ठरला आहे. देशात 80 कोटी इंटरनेट यूझर्स असून, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी हे इन्फ्ल्यूएन्सर्स महत्त्वाचे ठरले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. काही जणांची संख्या तर कोटींच्या घरात आहे. निवडणुकीतील 'सोशल मीडिया'च्या प्रभावाची चर्चा करणारा लेख…

सध्या देशभरामध्ये उन्हाच्या पार्‍याबरोबरीने लोकसभा निवडणुकीचा ज्वरही चढू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मग्न आहेत. गेल्या दशकभरामध्ये निवडणुकीच्या प्रचारात डिजिटल मीडिया हे महत्त्वाचे साधन ठरत आहे. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने या माध्यमाचा अत्यंत प्रभावीपणाने वापर करून घेतल्यानंतर सर्वच पक्षीय आता सोशल मीडियाच्या लाटेवर स्वार झालेले दिसताहेत. कालोघात समाजमाध्यमांचे विश्वही व्यापक बनले असून, अनेक नवनवीन संकल्पना आणि प्रवाह यामध्ये आकाराला येत आहेत. त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जात आहे. किंबहुना, सोशल मीडियाने स्वतःच्या भाषेचा एक वेगळा पटच तयार केला आहे. यामध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर हा शब्दप्रयोग खूप लोकप्रिय ठरला आहे. इन्फ्ल्यूएन्सर या इंग्रजी शब्दावरून बनलेला हा शब्द. 'इन्फ्ल्यूएन्स' म्हणजे प्रभाव टाकणे. त्यामुळे इन्फ्ल्यूएन्सर म्हणजे प्रभाव टाकणारा. 'प्रभावक.' सोशल मीडियाच्या अफाट पसार्‍यामध्ये लक्षावधी व्हिडीओ दररोज पोस्ट होत असतात. अनेकांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल्स निघाले आहेत. यापैकी ज्या व्यक्तीचे म्हणणे किंवा सादरीकरण ऐकायला-पाहायला लोकांना मोठ्या प्रमाणावर आवडते त्यांना प्रभावक म्हणून ओळखले जाते. थोडक्यात, जी व्यक्ती तिच्या कामातून, कौशल्यातून, विचारांमधून लोकांवर प्रभाव टाकते, अशा व्यक्तीला 'इन्फ्ल्यूएन्सर' म्हणून ओळखले जाते.

इन्फ्ल्यूएन्सरमध्ये त्यांना असणार्‍या लोकप्रियतेनुसार वर्गवारी केली जाते. मेगा इन्फ्ल्यूएन्सर, मॅक्रो इन्फ्ल्यूएन्सर, मायक्रो इन्फ्ल्यूएन्सर आणि नॅनो इन्फ्ल्यूएन्सर असे यामध्ये चार प्रकार आहेत. दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असणार्‍यांना मेगा इन्फ्ल्यूएन्सर म्हटले जाते. असे प्रभावक लोकांमध्ये खूप लोकप्रिय असतात. परिणामी, मोठमोठे ब्रँडदेखील त्यांच्या उत्पादनांच्या प्रचारासाठी या प्रभावकांचा आधार घेताना दिसतात. मॅक्रो इन्फ्ल्यूएन्सर म्हणजे साधारणतः 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स असणार्‍या व्यक्ती. बर्‍याच व्यवसायांना त्यांच्या उत्पादनाची माहिती कमी वेळेत मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवायची असते, ते अशाप्रकारच्या इन्फ्ल्यूएन्सरची मदत घेतात. मायक्रो व नॅनो इन्फ्ल्यूएन्सरना असणारी लोकप्रियता तुलनेने कमी असते.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक, 'बल्क' एसएमएस, केबल वेबसाईटस्, टी.व्ही. चॅनल्स आदी माध्यमांवरील जाहिरातींसाठी 325 कोटी रुपये खर्च केले, तर काँग्रेसने 356 कोटी रुपये खर्च केले होते. तथापि, कोरोनानंतर सोशल मीडियाकडे एक माध्यम म्हणून पाहण्याचा द़ृष्टिकोन खूप बदलला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूक प्रचारात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे आणि त्यामध्ये प्रभावकांचा वाटाही मोठा असणार आहे. कोणत्याही विधानसभेत 5,000 मतांचा फरकदेखील विजय किंवा पराभवासाठी महत्त्वाचा ठरतो. साधारणतः, सरासरी दोन लाख लोकसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात डिजिटल माध्यमांद्वारे 75,000 ते 80,000 लोकांना प्रभावित करणे शक्य आहे.

गेल्या काही महिन्यांत, तरुण प्रेक्षकांशी संपर्क साधण्यासाठी अनेक राजकारणी लोकप्रिय सोशल मीडिया 'प्रभावकां'च्या यूट्यूब चॅनलवर दिसू लागले आहेत. नितीन गडकरी, एस. जयशंकर, स्मृती इराणी, पीयूष गोयल आणि राजीव चंद्रशेखर यासारख्या भाजप नेत्यांनी हिंदी-इंग्रजीतील नावाजलेल्या पॉडकास्टरना मुलाखत दिली आहे. रणवीर अलाहबादिया यांचा यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांचे 70 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'कर्ली टेल्स' या ट्रॅव्हल आणि फूड व्हिडीओ पॉडकास्टच्या संस्थापक कामिया जानी यांच्याशीही संभाषण केल्याचे दिसून आले. चांदणी भगत ही तीन वर्षांपासून सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत व्हिडीओ पोस्ट करत राहते. आपल्या धार्मिक व्हिडीओत राजकीय सामग्रीचादेखील समावेश करत आहे. देशातील लोकसभा निवडणुकीसाठी ती नवीन स्टार प्रचारक म्हणून समोर येत आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात तिच्यासारखे असंख्य इन्फ्ल्यूएन्सर पक्षांच्या प्रचार कामात दिसून येत आहेत. 18 वर्षांच्या चांदणी भगतला दोन लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. गेल्यावर्षी भाजपने इंदूर येथे इन्फ्ल्यूएन्सर्सचे संमेलन बोलावले होते आणि त्या शंभरजणांत तिचा समावेश होता.

जगभराचा विचार करता, भारतात सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जातो. देशात 80 कोटी इंटरनेट यूझर्स असून, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना या इन्फ्ल्यूएन्सर्सचे महत्त्व कळून चुकले आहे. त्यांचा प्रभाव कितपत राहू शकतो, याचे आकलन भाजपला आणि अन्य पक्षांनादेखील झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: गेल्यावर्षी सोशल मीडियाच्या अनेक इन्फ्ल्यूएन्सर्सशी चर्चा केली होती. या मंडळींचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. काही जणांची संख्या तर कोटींच्या घरात आहे. त्यामुळेच मुख्य प्रवाहातील माध्यमांना बाजूला ठेवत सोशल मीडियावर मुलाखती देण्याकडे नेत्यांचा कल आहे. यात ट्रॅव्हल, फूड, धार्मिक, टेक्नॉलॉजी अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रातील इन्फ्ल्यूएन्सर्सचा समावेश आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्सच्या गतवर्षीच्या संमेलनात भाजपने 9 वर्षांतील सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती दिली होती आणि त्यांना या कामगिरीचा अनुभव घेत माहितीपट तयार करून तो शेअर करण्याचे आवाहन केले होते.
इन्फ्ल्यूएन्सर्सच्या प्रभावाचा फायदा घेण्यासाठी केवळ भाजपच नाही, तर अन्य पक्षही सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे वैभव वालिया काँग्रेस पक्षाशी अनेक इन्फ्ल्यूएन्सर्स जोडले गेल्याचे सांगतात. हे इन्फ्ल्यूएन्सर थेटपणे काँग्रेसची भूमिका मांडत जरी नसले, तरी पक्षाला अनुकूल मते मांडतात. पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'नेदेखील असेच प्रयोग केले होते. दक्षिणेत तेलंगणातदेखील 'बीआरएस'ने विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचारात सुमारे 250 इन्फ्ल्यूएन्सर्सना सामावून घेतले होते. त्यामुळे बहतुेक सर्वच पक्ष सोशल मीडियातील या नवप्रवाहाचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही तज्ज्ञ या ट्रेंडच्या संभाव्य धोक्याचाही इशारा देत आहेत. सर्वात मोठ्या लोकशाही देशात फेक न्यूज आणि अपप्रचार हा मोठा धोका असून, त्यासाठी इंटरनेट हे मोठे माध्यम आहे. अशावेळी पारदर्शकता हा कळीचा मुद्दा राहतो. या इन्फ्ल्यूएन्सरना पैसे किंवा अन्य कोणताही लाभ दिल्यास ते चुकीच्या माहितीच्या आधारावर मांडणी करू शकतात. तसे झाल्यास हा प्रचार संशयाच्या भोवर्‍यात सापडतो. भारतात 18 ते 21 वयोगटातील दोन कोटींपेक्षा अधिक तरुण मतदार आहेत. ही मंडळी इंटरनेटवर सर्वाधिक सक्रिय आहे. याशिवाय व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक रील्स वापरणारी आणि ती पोस्ट करणारी लोकसंख्यादेखील मोठी आहे. इन्फ्ल्यूएन्सर्सच्या माध्यमातून राजकीय पक्ष थेटपणे या वर्गापर्यंत पोहोचत आहेत. सोशल मीडियावरच्या या मंडळींच्या पोस्ट प्रपोगोंडाचा भाग वाटत नाही, ही यातील खरी मेख आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या इन्फ्ल्यूएन्सर्सकडे असणारे सादरीकरणाचे कौशल्य. आपल्या लाखो फॉलोअर्सना नेहमीप्रमाणेच एखादी पोस्ट टाकताना ही मंडळी राजकीय पक्षाचा, नेत्याचा प्रचार इतक्या बेमालूमपणाने करतात की, पाहणार्‍यांना प्रथमदर्शनी लक्षातही येत नाही; पण त्यांच्या मांडणीतून, सादरीकरणातून सदर यूझरची मतनिश्चिती करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. हा परिणाम नेमका किती होतो, याचे आकलन करण्याचे कोणतेही परिमाण उपलब्ध नसले, तरी त्रयस्थ असणार्‍या लोकप्रिय अशा व्यक्तीकडून एखाद्या पक्षाविषयीची, नेत्याविषयीची भूमिका मांडली जात असेल, तर त्याकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन हा स्वाभाविकपणे वेगळा बनतो. राजकीय नेते प्रचारसभांमधून जी गोष्ट सांगत आहेत, त्यालाच विविध पान खत वर

माहितीचा आधार देऊन प्रभावकांकडून ती गोष्ट अधिक विस्ताराने मांडली गेल्यास त्याचा मतदारांच्या मनावर परिणाम होतच असतो. आज डिजिटल मीडियाचा वापर करणारा वर्ग ज्या पद्धतीने विस्तारला आहे आणि तो दिवसातील अधिकाधिक वेळ या नवमाध्यमाशी जोडलेला दिसत आहे ते पाहता प्रभावकांकडून केला जाणारा प्रचार हा अनुपयोगी ठरत असेल, असे म्हणता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणा समाज माध्यम प्रभावकांची (सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर) मदत घेणार आहे. डिजिटल माध्यमातील या व्यक्तिमत्वांच्या प्रभावाचा उपयोग मतदान जागृतीसाठी करण्यात येणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, तेलंगणामध्ये अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियावरील प्रभावकांचा वापर सर्वच पक्षीयांनी केल्याचे दिसून आले.

भाजप अर्थातच यात आघाडीवर होती आणि निकालांमध्येही भाजपनेच बाजी मारली. यावरुन प्रभावकांचा प्रभाव लक्षात येतो. विशेष म्हणजे, त्यावेळी गेहलोत सरकारने राजस्थानातील सोशल मीडिया प्रभावकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या जाहिराती देण्याची घोषणा केली होती. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या कोणालाही 10,000 ते 5 लाख रुपये प्रति महिना जाहिराती मिळू शकतात, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या पाच-सात वर्षांमध्ये उदयाला आलेल्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरनी निवडणुकांच्या रणसंग्रामामध्ये आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि येणार्‍या काळात ते अधिक भक्कम होत जाणार आहे हे निश्चित.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news