डॉक्टरने मोटारीला बांधून कुत्र्याला तब्बल पाच कि.मी. फरफटत नेले

डॉक्टरने मोटारीला बांधून कुत्र्याला तब्बल पाच कि.मी. फरफटत नेले

जोधपूर; वृत्तसंस्था : जोधपूरमधील एका डॉक्टरने कुत्र्याला आपल्या कारला बांधून तब्बल 5 कि.मी. फरफटत नेले. कुत्र्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. रस्त्यावरील लोकांनी पाठलाग करून कार अडविली. प्राणीप्रेमींचा पुढाकार तसेच भाजप नेत्या मनेका गांधी यांनी प्रकरण लावून धरल्याने डॉक्टरविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

रजनिश गालवा असे या डॉक्टरचे नाव असून, त्यांना रोखणारे लोक तसेच जखमी कुत्र्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन आलेल्या डॉग होम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी त्यांनीच पोलिसांना फोन केला होता; पण शेवटी गुन्हा त्यांच्याविरुद्धच दाखल झाला. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी या प्रकरणाचा अखेरपर्यंत मागोवा घेतला. मनेका गांधींच्या फोनपूर्वी पोलिसांनी आमची अ‍ॅम्ब्युलन्सही रोखून धरली होती, असे डॉग होम फाऊंडेशनचे सदस्य कुलदीप यांनी सांगितले. डॉ. गालवा हे प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांनी सांगितले की, कुत्रा नेहमीच आमच्या घरात शिरत असे. माझ्या मुलीलाही चावला. त्यामुळे मी त्याला दूर सोडण्यासाठी जात होतो. भा.दं.वि. कलम 428, 429 व पी.सी. कायदा कलम 11 अंतर्गत भटक्या कुत्र्यांना मारहाण करणे गुन्हा आहे.

'प्राणी जनन दर नियंत्रण 2011'अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी करता येते; पण त्यांना ठार मारता येत नाही. भा.दं.वि.नुसार प्राण्यांना ठार मारणे, विष देणे किंवा पंगू करणे या गुन्ह्यांसाठी 5 वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, अशी तरतूद आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news