लसणाच्या चवीचा ठसका ! प्रतिकिलोचा दर 240 रुपयांवर

Garlic Rate
Garlic Rate

पुणे : मध्य प्रदेशातून लसणाची आवक घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर कडाडले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी (दि. 10) पाच ते सहा ट्रकमधून लसणाची आवक झाली. गतआठवड्याच्या तुलनेत ती दोन ट्रकने कमी राहिली. परिणामी, घाऊक बाजारात लसणाचे किलोचे दर 95 ते 160 रुपयांवर, तर किरकोळ बाजारात लसणाचे दर 220 ते 240 रुपये किलोंवर पोहोचले आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 95 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. लसूण वगळता अन्य फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने दर टिकून होते. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, इंदौर येथून 12 ते 13 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, बंगळूर येथून आले 1 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 5 ते 6 टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, गवार 6 ते 7 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो सुमारे 12 ते 13 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे 100 ते 125 गोणी, पावटा 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून 5 ते 6 टेम्पो, कांदा सुमारे 80 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

पालेभाज्यांचे भाव 'जैसे थे'च
पावसाने उघडीप दिल्यानंतर मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. त्या तुलनेने मागणीही असल्याने घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे कमी झालेले भाव टिकून आहेत. रविवारी बाजारात कोथिंबिरीची सव्वा लाख, तर मेथीची पन्नास हजार जुडींची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीची 3 ते 18 रुपये, तर किरकोळ बाजारात एका गड्डीची दहा ते पंधरा रुपये या दराने विक्री सुरू होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news