Russia-Ukraine war : युक्रेन : शस्त्रास्त्रांच्या भडिमारात एकाकी मुलांचा आक्रोश! व्हिडीओ व्हायरल

जीव वाचविण्यासाठी युक्रेन सीमा गाठण्याच्या धावपळीत आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या या मुलाचे हे अविरत अश्रू...
जीव वाचविण्यासाठी युक्रेन सीमा गाठण्याच्या धावपळीत आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या या मुलाचे हे अविरत अश्रू...
Published on: 
Updated on: 

कीव्ह/कोल्हापूर ; वृत्तसंस्था : एकीकडे युक्रेनमधील बालकांचे अश्रू आणि दुसरीकडे (Russia-Ukraine war) रशियाची क्षेपणास्त्रे, हे द‍ृश्य बघितल्यानंतर रशिया आणि युक्रेनमधील हे युद्ध आता माणुसकीचा संपूर्ण पाडाव करत दिवसेंदिवस पुढे सरकत चालले आहे, असेच हृदयद्रावक चित्र सध्या आहे.

रोज आदळणारी रशियाची क्षेपणास्त्रे युक्रेनमधील बाल्य उद्ध्वस्त करत आहेत. 'मी शिकून इंजिनिअर होणार', 'डॉक्टर होणार', ही मुलांच्या डोळ्यांतील उद्याची स्वप्ने क्षेपणास्त्रे, बॉम्ब हल्ल्यांतून उठणार्‍या आगीच्या कल्लोळांत काळवंडून गेली आहेत. पुढच्या क्षणाचा
भरवसा नसलेेले वर्तमान भाळी आलेले आहे, असे बाल्य भविष्याबद्दलचे आपले बोबडे बोल विसरून गेलेले आहे. अश्रू ही एकमेव अभिव्यक्‍ती या निरागस चेहर्‍यांतून आपला करुण आविष्कार प्रकट करत आहे. (Russia-Ukraine war)

युद्धग्रस्त युक्रेन सोडण्यासाठी देशाची सीमा गाठण्याच्या नादात आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या मुलांची संख्याही मोठी आहे. केवळ जीवासाठी रडतरडत वाट तुडवीत चाललेला छायाचित्रातील हा एकाकी मुलगा. कडाक्याच्या थंडीतील त्याचे कुडकुडत रडणे… आई-बाबांसाठी सुरू असलले त्याचे अरण्यरुदन… अहंकारात आणि रणक्रंदनात मग्‍न असलेल्या सत्ताधीशांना जणू 'बस करा' हेच सांगते आहे. इतक्या धुमश्‍चक्रीतही कुणी तरी या मुलाचे अरण्यरुदन चित्रित केले… हा व्हिडीओ त्सुनामीच्या वेगाने व्हायरल झाला. इथे कोल्हापुरात एक माता हा व्हिडीओ बघत असताना उत्स्फूर्तपणे म्हणाली, 'पुतीननं हा व्हिडीओ बघाया पाह्यजे, युद्ध थांबवल बघा तो…'

मातृहृदयाला कोण समजावणार, अश्रूंनी युद्धे थांबत नसतात… युक्रेनने विनाशर्त शरणागती पत्करावी म्हणून रशियन फौजा दररोज युक्रेनच्या नवनवीन शहरांना लक्ष्य करत आहेत. लोक आपला जीव वाचविण्यासाठी राहते घर, मालमत्ता सर्व सोडून युक्रेनबाहेर पडत आहेत. मुले, वृद्धच काय, आजारी माणसेही रुग्णालयांत थांबायला तयार नाहीत. उरलेल्या त्राणासह ते जीवनाच्या शोधात वाट मिळेल तसे चालत आहेत.

आपण मेलो तर चालेल; पण मुलगा जगला पाहिजे, या भावनेने काळजावर दगड ठेवून रशियाच्या ताब्यातील झापोरिझ्झियातील आई-बाबांनी आपला अकरा वर्षांचा पोर रेल्वेत बसवून दिला. सोमवारी हा मुलगा स्लोव्हाकियाला पोहोचला तेव्हा 'वीर बालक' म्हणून जगभरात गौरविला गेला… जग हे असेच आहे… अमेरिका, नाटोसह सर्व युरोपियन देशांनी आम्ही आहोत, आम्ही आहोत म्हणून युक्रेनला नादाला लावले आणि ऐन युद्धावेळी युक्रेनला मरण्यासाठी एकटे सोडले आहे. अगदी तसेच एक हजार कि.मी.चा प्रवास एकट्याने केला म्हणून या मुलाला 'वीर बालक' असे गौरवून जगाने जणू आपली जबाबदारी पार पाडली आहे!!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news