CM Of Maharashtra : औरंगाबाद दाैर्‍यानंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांना सोडावा लागला होता ‘वर्षा’ बंगला

CM Of Maharashtra : औरंगाबाद दाैर्‍यानंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांना सोडावा लागला होता ‘वर्षा’ बंगला

Published on

औरंगाबाद ; उमेश काळे :

हा कदाचित राजकीय योगायोगच म्हणावा लागेल. कारण आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ज्यांनी ज्यांनी औरंगाबाद दौरा केला, त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्याचे निवास्थान असलेला 'वर्षा' बंगला हा अचानक सोडावा लागला आहे. यामध्‍ये वसंतराव नाईक, शिवाजीराव पाटील निलंगेकर, सुधाकरराव नाईक हे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समावेश आहे.

मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही मागणी १९७३ साली पुढे आल्यानंतर, शंकररावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तेव्हा वसंतराव नाईक हे औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड दौऱ्यावर होते. तेव्हा निरोप पोहचविण्यासाठी अत्याधुनिक साधने नव्हती. तेव्हा मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार बा. न. मग्गिरवार यांच्याशी यशवंतरावांनी संपर्क केला. वसंतराव नाईकांना सांगा, उद्या कदाचित राजीनामा द्यावा लागेल, असा संदेश त्यांना द्या असे मग्गिरवार यांना सांगण्यात आले. मग्गिरवार यांनी हा संदेश दिल्यानंतर नाईक यांनी 'हो मला अंदाज आला आहे' असे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी नाईकांनी पदत्याग केला. तेव्हा परदेश दौऱ्यावर असणाऱ्या शंकरराव चव्हाण यांना तातडीने बोलावून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली. त्यामुळे वसंतराव नाईकांना अचानक 'वर्षा' बंगला सोडावा लागला होता.

जून १९८५ ते मार्च ८६ हा अत्यल्प कालखंड मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा होता. मराठवाड्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे निलंगेकर यांचा औरंगाबादमध्ये मोठा नागरी सत्कार आणि भव्य मिरवणूक असा कार्यक्रम झाला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या मुलीचे वैद्यकीय गुणवाढ प्रकरण उजेडात आले आणि अवघ्या ९ महिन्यातच निलंगेकरांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले.

सुधाकरराव नाईक यांच्या नशिबीही औरंगाबाद दौरा हा मुख्यमंत्री म्हणून शेवटचाच ठरला. शरद पवार यांच्यावर कडक शब्दात टीका केल्यानंतर त्यांना चार दिवसांतच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. १९९३ मध्ये औरंगाबाद दौरा झाल्यावर सुधाकर नाईकांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि वर्षा बंगला सोडावा लागला. त्यानंतर केंद्रात संरक्षण मंत्री असणाऱ्या शरद पवारांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्याचे मविआचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच महिन्यात ८ जून रोजी औरंगाबाद दौरा केला होता. यावेळी त्‍यांची भव्‍य जाहीर सभाही झाली हाेती. या दौऱ्यानंतर १५ दिवसांतच त्यांना राज्यसभा, विधान परिषद निवणुकीत धक्का सहन करावा लागला. आता उध्दव ठाकरे यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना वर्षा बंगलाही सोडावा लागला. औरंगाबाद दाैर्‍यानंतर वर्षा बंगला साेडावे लागणारे ते राज्‍यातील चाैथे  मुख्‍यमंत्री ठरले आहेत.

याचबरोबर महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौऱ्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा छोटासा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असाच दुसरा हेलिकॉप्टर अपघात हा २५ मे २०१७ रोजी निलंगा येथे झाला. या हेलिकॉप्टरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.

विलासराव देशमुख यांना पहिल्या टर्ममध्ये अचानक राजीनामा द्यावा लागला. ती तारीख होती १६ जानेवारी २००३. याच दिवशी संध्याकाळी औरंगाबादला एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी विलासराव आले होते. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी एकही कार्यकर्ता नव्हता. एवढेच काय त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबाद खंडपीठात एक राजकीय केस देखील सुरु होती. त्यावेळी विलासराव हे अनेकदा कोर्ट परिसरात एकटे दिसले होते. सत्ता असली की लोक आपल्याभोवती गर्दी करतात, मात्र नंतर कोणी विचारत नसल्याची खंतही अनेकदा विलासराव देशमुख यांनी बोलूनही दाखविली होती.

२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा प्रयोग फसल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.  सायंकाळी एका लग्नसमारंभासाठी ते औरंगाबादला आले. हा विमान प्रवास त्यांनी सामान्य कक्षात केल्यामुळे त्यांचा साधेपणा अनेकांना भावला. मराठवाड्यातून मुख्यमंत्री झालेल्या शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांना पुढे केंद्रात मंत्रिपदे देण्यात आली. त्यात शंकरराव चव्हाण यांनी गृह, अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली. विलासरावांकडे केंद्रीय अवजड उद्योग, विज्ञान व तंत्रज्ञान ही खाती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news