बारामती : पुढारी वृत्तसेवा : ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वडगाव निंबाळकर येथील नरेश म्हस्कू साळवे (वय ५५) यांचा मृतदेह अखेर रविवारी (दि. १६) सकाळी सापडला. वडगावातील ओढा पात्रापासून एक किमी अंतरावर हा मृतदेह शोधण्यात यश आले. गेल्या चार दिवसांपासून साळवे यांचा शोध सुरु होता. गुरुवारी (दि. १३) माळीवस्तीकडून बाजारतळाकडे साळवे हे निघाले होते. यावेळी बाजारतळाजवळील पुलावरून पाणी वाहत होते. रोजचा रस्ता असल्याने सहज पलिकडे जावू असे त्यांना वाटले. परंतु यावेळी पुलावरून सुमारे तीन हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्याच्या वेगाने ते घसरून पुलावरून खाली पडत वाहत गेले. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ केला होता. ग्रामस्थांनी तात्काळ ही बाब वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला कळवली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी कर्मचाऱयांसह धाव घेत शोध सुरु केला. ग्रामस्थांनीही शोध कार्य हाती घेतले.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्य़क्ष संभाजी होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे आदींनी घटनास्थळी भेट दिली होती. साळवे यांना शोधण्याचे काम अहोरात्र सुरु होते. परंतु त्यात यश येत नव्हते. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ तसेच राष्ट्रवादी आपत्ती व्यवस्थापन सेलकडून शोध कार्य केले जात होते. अखेर रविवारी घटनास्थळावरून एक किमी अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. शोधकार्यात आपत्ती व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष संतोष शेलार, राष्ट्रवादी सेलचे करिम सय्यद, सागर जाबरे, संदीप गव्हाणे, नीलेश कुसाळकर, दिलीप गायकवाड, मनोज साळवे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आपत्ती व्यवस्थापन फंडातून मदत
नरेश साळवे यांचा पूराच्या आपत्तीत दुदैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन फंडातून मदत होईल, असे आश्वासन तहसीलदार विजय पाटील यांनी दिले आहे.