फुटबॉल विश्वचषकातील मोठे वाद; सँटियागोच्या लढाईपासून ते सुआरेझच्या चाव्यापर्यंत…

फुटबॉल विश्वचषकातील मोठे वाद; सँटियागोच्या लढाईपासून ते सुआरेझच्या चाव्यापर्यंत…
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आजपासून फुटबॉल विश्वचषक कतारमध्ये होणार आहे. मध्य आशियाई देशात पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचे आयोजन केले आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेत 32 देश सहभागी होणार आहेत. हे देश 8 गटांत विभागले गेले आहेत. प्रत्येक गटात 4 संघ आहेत.

कतारमध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच यंदाचा विश्वचषक वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. फुटबॉल स्टेडियममध्ये काम करणार्‍या मजुरांचा मृत्यू आणि त्यांच्याशी होत असलेल्या भेदभावामुळे कतार चर्चेत आहे. याशिवाय कतारच्या तापमानावरही चर्चा होत आहे. स्टेडियमच्या आजूबाजूला अशा मशिन्स बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे उष्णतेवर नियंत्रण येईल, असे निवेदन आयोजकांनी दिले होते. मात्र, हे सर्व वाद फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत नाहीत. याआधीही अनेक मोठे वाद झाले आहेत, ज्यांची चर्चा आजवर होत आहे. जाणून घेऊया काही निवडक फुटबॉल विश्वचषकातील वादांबद्दल…

फॅसिझमला इटालियन संघाचे समर्थन (1938)

फिफा विश्वचषक 1938 मध्ये दुसर्‍या महायुद्धापूर्वी आयोजित करण्यात आला होता. उपांत्यपूर्व फेरीत दोन वेळचा गतविजेता इटलीचा सामना फ्रान्सशी झाला. हा सामना निषेधासाठी लक्षात ठेवला जातो, फ्रान्सने इटालियन फॅसिझमच्या निषेधार्थ निळी जर्सी घालून मैदानात उतरला होता. तर, मुसोलिनीच्या आदेशावरून फॅसिझमच्या समर्थनात इटालियन संघ काळा शर्ट घालून मैदानावर आला होता.

सँटियागोची लढाई (1962)

1962 च्या फिफा विश्वचषकात चिली आणि इटलीच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. यावेळी तीन वेळा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सामन्यादरम्यान चिलीच्या लिओनेल सँचेझने इटलीच्या मारियो डेव्हिडला ठोसा मारल्याची घटना घडली होती. यानंतर सँचेझने डेव्हिडच्या डोक्यावर लाथ मारली आणि सँचेझने इटलीच्या हंबरटो माशियोचे नाक तोडले. या सामन्यापासून फुटबॉलमध्ये लाल आणि पिवळ्या कार्डांना सुरुवात झाली.

रेफरी बखरामोव्हचा वादग्रस्त निर्णय (1966)

1966 चा विश्वचषक वादग्रस्त ठरला होता. या सामन्यात इंग्लंड आणि पश्चिम जर्मनी यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात इंग्लंडच्या ज्योफ हर्स्टने गोलवर मारलेला शॉट गोलपोस्टच्या रेषेजवळ पडला. यावर रेफ्री टोफिक बखरामोव्ह यांनी चेंडू रेषेच्या आत आहे, असे समजून गोल घोषित केला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील वादांच्या यादीत या निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे.

बॅटिस्टनवर शूमाकरचा हल्ला (1982)

1982 च्या फुटबॉल विश्वचषकाची उपांत्य फेरी पश्चिम जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात झाली. बदली खेळाडू पॅट्रिक बॅटिस्टन चेंडू घेऊन वेगाने गोल पोस्टच्या दिशेने जात होता. पश्चिम जर्मन संघाचा गोलरक्षक हेराल्ड शूमाकरने बॅटिस्टनला टक्कर दिली. या टक्करमुळे बॅटिस्टन जमिनीवर पडला आणि त्याचे दोन दात तुटले.

झिनेदिन झिदानचे हेडबट (2006)

महान फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदानच्या कारकिर्दीवरील हा एकमेव डाग आहे, जो तो इच्छित असूनही पुसू शकत नाही. 9 जुलै 2006 रोजी इटली आणि फ्रान्स यांच्यात सामना झाला होता. सामन्याच्या 19 व्या मिनिटाला मार्को माटेराझीने इटलीसाठी बरोबरीचा गोल केला. दरम्यान, मतेराजींनी केलेल्या टिपण्णीचा झिदानला राग आला. त्याने मातेराजीच्या छातीवर जोरदार टक्कर मारली. ही टक्कर इतकी जोरदार होती की इटलीचा मार्को माटेराझी जमिनीवर पडला. यानंतर रेफ्रींनी झिदानला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news