महात्मा फुले जनआरोग्य योजनेची रक्कम दीड लाखावरून पाच लाख

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची रक्कम दीड लाखावरून पाच लाख

मुंबई : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व कुटुंबांना मिळणार असून त्यासाठी वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

या माध्यमातून सरकारने राज्यातील नागरिकांना विमा संरक्षणाचे कवच दिले आहे. मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकर्‍यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत 8 लाख 50 हजार नवे सौर कृषिपंप बसवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टी म्हणजेच अण्णा भाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य आता 1 हजार रुपयावरून दीड हजार केले. ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news