पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर व कोथरूडच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील गटांसाठी घातक प्रकारात मोडत आहे. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत त्यांनी स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूडसह जेथे हवेची गुणवत्ता खराब आहे त्या ठिकाणी जाताना सतत मास्क व गॉगल वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
यंदाच्या दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून शहराच्या हवेची गुणवत्ता सतत खालवत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूड,
भूमकर चौक, कात्रज चौक या भागांत धूलिकणांचे प्रमाण सतत वाढतच आहे. अतिसूक्ष्म धुलिकण (पी.एम.2.5) व सूक्ष्म धूलिकण (पीएम10) यासह कार्बन मोनाक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. याबाबत डॉक्टर म्हणतात की, अशा प्रकारच्या हवेमुळे खोकला, धाप लागणे, सीओपीडी, फुफ्फुसावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अशी मोजतात हवेची गुणवत्ता
0 ते 50 (शुद्ध हवा)
50 ते 100 (मध्यम)
100 ते 150 (संवेदनशील गटांसाठी धोकादायक)
150 ते 200 (अनारोग्यकारक)
200 ते 300 (खूप खराब)
300 ते 400 (घातक)
खराब हवेचे दुष्परिणाम
खोकला, धाप लागणे,सीओपीडी, दमा, फुफ्फुसावर विपरीत परिणाम व कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, श्वसनाचे आजार, सायनुसोयटिस
काय काळजी घ्याल
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोंडावर मास्क, हेल्मेट्स पीपीई किट घालून काम करावे, रस्त्यावरून जाताना मास्क, गॉगलचा वापर करावा, भरपूर पाणी प्या व्यायाम करा.