बारामती : उपकारागृहाच्या उंच भिंतीवरून आरोपीने मारली उडी; रुग्णालयात दाखल

बारामती : उपकारागृहाच्या उंच भिंतीवरून आरोपीने मारली उडी; रुग्णालयात दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या उपकारागृहातून पलायन करण्याच्या उद्देशाने आरोपीने उंच भिंतीवरून उडी मारल्याने तो खाली पडला. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भैरु भानुदास शिंदे (वय ४०, रा. खातगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

संबंधित बातम्या 

सन २०१९ च्या एका खूनाच्या गुन्ह्यात भैरु शिंदे हा सध्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. हे उपकारागृह येथील श्रीमंत बाबुजी नाईक वाड्यात आहे. येथील बहुतांश आरोपी येरवडा कारागृहात हलविले जात आहेत. आपल्याला तेथे नेले जाईल अशी भीती त्याला होती. त्यातून त्याने हा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. कारागृहातून त्याने पलायनाची तयारी केली. त्यानुसार तो बाहेर आला.

वाड्याच्या भिंतीवर तो चढला. परंतु, भिंतीवरून उडी मारण्यास तो घाबरत होता. अखेर मनाची हिमंत करून त्याने भिंतीवरून उडी मारली. नगरपरिषद शाळा क्रमांक सहाच्या बाजूला तो खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तपासणीत त्याच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान शिंदे याच्यावर भादंवि कलम २२४, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news