नगर : ‘त्या’ व्हिडिओ क्लिप ‘चौकशी’ला वेगळे वळण!

नगर : ‘त्या’ व्हिडिओ क्लिप ‘चौकशी’ला वेगळे वळण!

नगर; पुढारी वृत्तसेवा : डीएड, टीईटी परीक्षेसंदर्भातील खळबळ उडवून देणारी व्हिडीओ क्लिप नगरमधून बाहेर पडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. मात्र शिक्षण आयुक्तांनी गठीत केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीतील अध्यक्षांनीच यातून माघार घेतल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.

नगर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील एका जबाबदार अधिकारी आणि अन्य शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये डीएड आणि टीईटी परीक्षेसाठी झालेल्या सौदेबाजीची एक व्हिडीओ क्लिप गत आठवड्यात बाहेर आली. यामध्ये टीईटी परीक्षेत पुणेत कोणाकडे पैसे द्यायचे, त्यांच्याशी आपले कसे संबध आहेत, ते पूर्वी कोठे होते, याशिवाय यापूर्वीही केलेल्या 'कामा'चा आणि त्या त्या अधिकार्‍यांच्या नावाचा यात स्पष्ट उल्लेख आलेला आहे. याची शिक्षण आयुक्त शैलेजा दराडे यांनी गंभीर दखल घेवून, 20 मार्च रोजीच चौकशीचे आदेश काढले.

त्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून डाएटचे प्राचार्य भगवान खार्के, सदस्य म्हणून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, तर सदस्य सचिव म्हणून भास्कर पाटील यांच्यावर जबाबदारी दिली. सात दिवसांत या समितीने संबंधित व्यक्तीची चौकशी करून अहवाल देण्याचेही आदेशात म्हटले. त्यामुळे या अहवालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, चार दिवसानंतरही अजुन ही चौकशी सुरू झालेली नाही. या समितीचे अध्यक्ष प्रा. खार्के यांनीच आयुक्तांकडे लेखी मागणी करून 'ही' जबाबदारी माझ्यावर देवू नये, त्याऐवजी अन्य कोणाकडे ती द्यावी, असे साकडे घातल्याचे समजले आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे. खार्के यांच्यावर नेमका कोणता दबाव आला, की व्हिडीओतील व्यक्ती, त्यांनी घेतलेली 'ती' नावे, यामुळे त्यांनी स्वतःला दूर ठेवले, याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

माझ्याकडे अगोदरच प्रशासकीय कामांची मोठी जबाबदारी आहे. त्यातच यापूर्वी आपण अशाप्रकारे कधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळे मी स्वतः आयुक्तांना ही जबाबदारी माझ्यावर देवू नये, असे कळविले आहे.

                                      – भगवान खार्के, अध्यक्ष, चौकशी समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news