ठाणे : पुढारी वृत्तसेवा – रिमझिम पाऊस आणि आला रे आला गोविंदा आला, गोविंदा रे गोपाला अशा घोषणांनी निनादणारा आसमंत… तुझी घागर उताणी रे गोपाळा या गाण्यावर पाय थिरकायला लावणारे गीत आणि उंचच उंच लावले जाणारे मानवी मनोरे अशा वातावरणात सारे ठाणे गोविंदामय झाल्याचे चित्र आज सकाळ पासून सर्वत्र दिसून येतंय.
यंदा ठाण्यात सर्वच राजकीय गटात जोरदार वर्चस्वाची चुरस असून दहीहंडी उत्सवातून ही चुरस दिसून येत आहे. दरम्यान, आज ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत 284 ठिकाणी सार्वजनिक तर 1 हजार 147 ठिकाणी खासगी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणेच नव्हे तर मुंबईतून देखील मोठ्या संख्येने गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी ठाण्यात येत आहेत. तर दहीकाला उत्सवात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्यात सात डीसीपी, 14 एसीपी, 85 पोलीस निरीक्षक, 275 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 3400 पोलीस कर्मचार्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. याशिवाय 500 होमगार्ड, 4 एसआरपीच्या तुकड्या, क्यूआरटी पथक आदी फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अनेक मातब्बर नेत्यांसह चित्रपत्र सिनेतारकांची मांदियाळी देखील विविध दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
दहीहंडी उत्सवाची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली. यावेळी गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केला. पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर जय जवान गोविंदा पथकाने शिस्तबद्धरित्या नऊ थरांची सलामी याठिकाणी दिली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावतीने ठाण्यातील वर्तकनगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी नऊ थर रचून विश्वविक्रम केला होता. गुरुवारी सकाळी ठाण्यात दाखल झालेल्या या गोविंदा पथकाने सर्वप्रथम संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थर रचण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात याच ठिकाणी पथकाने नऊ थरांची यशस्वी सलामी दिली. यावेळी उपस्थितांनी श्वास रोखून धरले होते. जय जवान गोविंदा पथकाने शिस्तबद्ध सलामी दिल्यानंतर उत्सवाचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्कृती युवा प्रतिष्ठानच्याच दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पाठोपाठ कोकण नगरच्या जोगेश्वरी गोविंदा पथकानेही पहिल्यांदा 9 थर लावले आहेत .जय जवान गोविंदा पाठोपाठ 9 थर लावणारे जोगेश्वरीच्या गोविंदा पथक हे दुसरे गोविंदा पथक आहे.
ठाणे : वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकाकडून सहा थरांची सलामी देण्यात आली. यंदाच्या उत्सवात महिला गोविंदा पथकांचे हे पहिलेच सहा थर आहेत.