मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे, आम्ही वैचारिक विरोधक आहोत. मात्र, आमच्यात कसलेही शत्रुत्व नाही. अलीकडे शत्रुत्व पाहायला मिळते. ते संपवावे लागेल, असे सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी कालच एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना फडणवीस हे आमचे राजकीय विरोधक असले तरी आम्ही त्यांना मित्रच मानतो, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. (Thackeray vs Fadnavis )
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रुत्व पाहायला मिळते. ते योग्य नाही. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव आणि आदित्य हे माझे शत्रू नाहीत. त्यांची आणि माझी विचारसरणी वेगळी आहे, एवढाच काय तो फरक. मी अनेक गोष्टी अनुभवातून शिकलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, कुणाला 'वाटले होते का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो भावी असे वाटतो, त्याला त्याला शुभेच्छा दिल्या जातात, असे ते म्हणाले. मी हेच वारंवार सांगितले. फडणवीस आमचे शत्रू नाहीत. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत, या आदित्य यांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले की, हे खरे आहे. मी हेच वारंवार सांगितले आहे. आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजिबात नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. मी असे म्हणेन की, यात आपण वैचारिक विरोधक असतो.
संजय राऊत यांना माझी क्षमता अधिक आहे असे वाटते. त्यांचा माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. मात्र, अलीकडे राऊत जे बोलत आहेत, ते पाहता त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्यासारख्या नेत्याने बोलताना वस्तुस्थिती पाहून, संयम पाळून बोलणे गरजेचे आहे. निदान लोकांना खरे वाटेल, असे तरी बोलायला हवे.
आदित्य ठाकरे म्हणाले होते की, फडणवीसांशी आमचे संबंध आजही उत्तम आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझे मन स्वच्छ आहे. आमच्या घरातही असेच वातावरण आहे. आमच्यावर अनेकांनी अगदी खालच्या पातळीवरील टीका केली. मात्र, आम्ही त्या भाषेत कधीच प्रत्युत्तर दिले नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे साच्या महाराष्ट्राला माहीत आहे. आम्ही काहीही 'पर्सनली' काही घेत नाही.
पहाटेच्या शपथविधीबद्दल मी जे बोललो ते कसे खरे होते हे आता तुमच्या लक्षात यायला लागले आहे. मात्र, मी जे बोललो त्याचा अर्धा भागच समोर आला आहे. मी काहीही बोललो की, समोरून दुसरी गोष्ट बाहेर येते. मी टप्प्याटप्प्याने बोललो की, सगळ्या गोष्टी समोरून उघड होतील.
हेही वाचा