पुणे : टीईटी परीक्षेचा निकाल केवळ पावणेचार टक्के

पुणे : टीईटी परीक्षेचा निकाल केवळ पावणेचार टक्के

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2021मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात 'टीईटी'चा निकाल केवळ 3.70 टक्के लागला आहे. परीक्षा दिलेल्या तब्बल 4 लाख 68 हजार 679 उमेदवारांपैकी 17 हजार 322 उमेदवार पात्र ठरले आहेत. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी निकाल जाहीर केला आहे. राज्य परीक्षा परिषदेने 21 नोव्हेंबर 2021 रोजी 'टीईटी' घेतली होती. त्यात पहिली ते पाचवीसाठीचा पेपर एक दिलेल्या 2 लाख 54 हजार 428 उमेदवारांपैकी 9 हजार 674 उमेदवार पात्र झाले. या गटाच्या पात्रतेची टक्केवारी 3.80 आहे.

64 हजार 647 उमेदवारांनी सहावी ते आठवीसाठी गणित, विज्ञान विषयांचा पेपर दोन दिला होता. त्यातील केवळ 1.45 टक्के, म्हणजेच 937 उमेदवार पात्र झाले, तर सहावी ते आठवीच्या सामाजिक शास्त्रचा पेपर दोन हा 1 लाख 49 हजार 604 उमेदवारांनी दिला होता. त्यातील 6 हजार 711 (4.49 टक्के) उमेदवार उत्तीर्ण ठरले. पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत प्रमाणपत्र पाठविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली 'टीईटी' गेल्यावर्षी चर्चेत आली. राज्य परीक्षा परिषदेने 2018 आणि 2019 मध्ये घेतलेल्या 'टीईटी'तील गैरप्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. याप्रकरणी उच्चपदस्थ अधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. 2018 च्या परीक्षेत 1 हजार 663 उमेदवारांनी, तर 2019च्या परीक्षेत 7 हजार 874 उमेदवार असे साडेनऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. परीक्षा परिषदेने संबंधित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांची संपादणूक रद्द करण्याची कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news