नवी दिल्ली : टेस्टॉस्टेरॉन हे पुरुषी हार्मोनचे नाव आहे. ते पुरुषांच्या कमी रडण्यासाठीही जबाबदार असावे असे एक संशोधन आता झाले आहे. सर्वसामान्यपणे असे दिसून येते की पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक रडतात. अर्थात पुरुष रडतच नाहीत असे नसते. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक भावूक असतात असे मानले जाते. तसेच पुरुषांना चारचौघात रडण्याची लाजही वाटते असेही म्हटले जाते. आता त्याबाबत नवे संशोधन करण्यात आले आहे.
पुरुषांच्या रडण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनांनुसार, अभ्यासकांची याबाबतची मते वेगवेगळी आहेत. काही अभ्यासक म्हणतात, ही बाब अजूनही एक रहस्य बनून आहे. सामान्यपणे असे म्हटले जाते की भावनात्मक रूपाने कोणत्याही वेळी, कुणीही कमजोर होतात त्यावेळी त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया रडणं ही असते. महिला आणि पुरुषांच्या रडण्याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळले की महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रडण्याचा दर कमी आहे. जर पुरुष रडलेच तर ते कमी वेळासाठी रडतात. महिलांमध्ये रडण्यासाठी प्रोलेक्टिन हार्मोन जबाबदार मानला जातो. तर पुरुषांच्या कमी रडण्यासाठी टेस्टॉस्टेरॉनच्या वाढत्या स्तराला जबाबदार मानले जाते.
पुरुषांना ज्यावेळी प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारासाठी अँटी टेस्टॉस्टेरॉनची औषधे दिली जातात, त्यावेळी त्याचा प्रभाव त्यांच्या रडण्याच्याही प्रवृत्तीवर स्पष्टपणे दिसून येतो. याचा अर्थ रडणे आणि टेस्टॉस्टेरॉन यांच्यामध्ये काही तरी संबंध आहे! काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की पुरुषांच्या रडण्यावर किंवा न रडण्यावर केवळ टेस्टॉस्टेरॉनलाच जबाबदार धरता येणार नाही. हार्मोनचे अतिरिक्त कारणेही असतात. या कारणांना अजून समजून घेण्याची गरज आहे, जेणेकरून पुरुषांच्या भावना आणि त्यांचा व्यवहार आणखी खोलवर समजून घेता येईल.